दिल्लीत केदारनाथ.. उत्तराखंडपर्यंत वाद; काय आहे संपूर्ण प्रकरण?
दिल्लीत प्रति केदारनाथ मंदिर बांधलं जात असून नुकतंच त्याचं भूमिपूजन करण्यात आलं. मात्र या मंदिरावर उत्तराखंडपर्यंत जोरदार वाद सुरू आहे. केदारनाथ धामच्या पुजाऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी, स्थानिकांनी दिल्लीतील या मंदिर बांधणीला विरोध केला आहे.
दिल्लीतील बुरारी इथं बाबा केदार यांचं मंदिर बांधलं जात आहे. या मंदिराचं नाव श्री केदारनाथ दिल्ली धाम मंदिर असं आहे. तीन एकर परिसरात हे मंदिर बांधलं जाणार आहे. 10 जुलै रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्याचं भूमिपूजन केलं. केदारनाथ धाम ट्रस्ट मंदिर बुरारी यांच्याकडून बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र भूमिपुजेनंतर या मंदिराच्या बांधकामास विरोध होत आहे. याबाबत केदारनाथ धामपासून संपूर्ण केदार खोऱ्यात नाराजी आहे. केदारनाथ धामशी संबंधित पंडित आणि पुजाऱ्यांमध्ये याविषयी संताप आहे. कारण केदारनाथ धामशी कोट्यवधी हिंदूंची श्रद्धा जोडली गेली आहे. त्यामुळे बाबा केदारनाथ यांचं मंदिर दुसरीकडे बांधणं हे तीर्थक्षेत्राच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे आणि धामांवरील लोकांच्या श्रद्धेवरही आघात आहे, असं म्हटलं जात आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनीसुद्धा दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या या मंदिराला विरोध केला आहे. तर बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने (बीकेटीसी) थेट इशारा दिला आहे की ‘श्री केदारनाथ धाम ट्रस्ट’ने जर दिल्लीच्या बुरारीमध्ये केदारनाथ मंदिराची प्रतिकृती बांधण्याची योजना पुढे नेली, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. हा संपूर्ण वाद काय आहे, ते जाणून घेऊयात..
ट्रस्टच्या अध्यक्षांच्या वक्तव्यावरून वाद
बुरारीमधील हिरंकी याठिकाणी केदारनाथ मंदिर बांधलं जाणार आहे. या मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केदारनाथ धाम ट्रस्ट बुरारीचे अध्यक्ष, भूमिपूजन आणि बांधकामाचं काम पाहणारे सुरेंद्र रौतेला यांनी एक वक्तव्य केलं होतं. ज्यावरून हा वाद निर्माण झाला. “केदारनाथ धामला जाण्यास असमर्थ असलेले वृद्ध आता दिल्लीत बाबा केदारनाथचं दर्शन घेऊ शकतील. केदारनाथ मंदिराच्या धर्तीवर या मंदिराचं मॉडेल बनवलं जात आहे”, असं ते म्हणाले होते.
मुख्यमंत्री धामी काय म्हणाले?
भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री धामी म्हणाले, “दिल्लीत बाबा केदार यांच्या मंदिराच्या उभारणीने सर्व शिवभक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील. बुरारी प्रदेशाचा उल्लेख आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. या परिसराचा महाभारत काळाशीही संबंध आहे. बुरारीच्या पवित्र भूमीवर बाबा केदारनाथजींचं मंदिर हे आपल्या संस्कृती आणि विश्वासाचं आधुनिक प्रतीक बनेल. या मंदिरामुळे शिवभक्तांची श्रद्धा आणि सनातन संस्कृती दृढ होईल. हे मंदिर श्रद्धेला जीवनाशी, मानवाला महादेवाशी, समाजाला अध्यात्माशी आणि सध्याच्या पिढीला प्राचीन संस्कृतीशी जोडण्याचं काम करेलं.”
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा विरोध
ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रति केदारनाथ मंदिराला उघडपणे विरोध केला आहे. याविषयी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “दिल्लीत प्रति केदारनाथ बनू शकत नाही. केदारनाथ हिमालयात आहे, ते दिल्लीत असू शकत नाही. केदारनाथचं कुठलंही प्रतिकात्मक बांधकाम केलं जाऊ शकत नाही. 12 ज्योतिर्लिंगांचा उल्लेख शिवपुराणात नावं आणि स्थानांसह आहे. त्यानुसार केदारनाथ हिमालयात असताना ते दिल्लीत कसं बांधलं जाऊ शकतं?” यावेळी त्यांनी केदारनाथमधील सोन्याच्या घोटाळ्याकडेही लक्ष वेधलं आहे. “केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. तो मुद्दा का उपस्थित केला जात नाही? तिथे घोटाळा केल्यानंतर आता केदारनाथ दिल्लीत बांधणार का? मग तर आणखी एक घोटाळा होईल. केदारनाथमधून 228 किलो सोनं गायब आहे. त्याचा तपाससुद्धा सुरू झालेला नाही. याला कोण जबाबदार आहे? आता ते म्हणतायत की केदारनाथ दिल्लीत बांधणार, असं होऊ शकत नाही”, असं ते म्हणाले.
उत्तराखंडमध्ये साधू-संतांचं धरणे आंदोलन
केदारनाथ धामचे पुजारी, व्यापारी आणि स्थानिक लोकांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शनं सुरू केली होती. केदारघाटीच्या सीतापूरमध्ये केदारघाटी हॉटेल असोसिएशनच्या बॅनरखाली व्यापाऱ्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याविरोधात निदर्शनंही केली होती. “दिल्लीतील केदारनाथच्या प्रतिकात्मक मंदिराच्या बांधकामामुळे केदारघाटीतील लोकांमध्ये संताप आहे”, असं हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम गोस्वामी म्हणाले होते.
“दिल्ली केदारनाथ – केदारनाथ धाम वेगवेगळे”
या संपूर्ण वादावर केदारनाथ धाम ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र रौतेला म्हणाले, “दिल्लीत बांधण्यात येणारं केदारनाथचं मंदिर हे एक मंदिर आहे, धाम नाही. हे मंदिर दिल्लीतील श्री केदारनाथ धाम ट्रस्टकडून बांधलं जाणार आहे. याच्याशी उत्तराखंड सरकारचा काहीही संबंध नाही. आमच्या विनंतीवरून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे मंदिराच्या भूमिपूजनासाठी आले होते. पण सरकारचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. विश्वस्तांच्या सहकार्याने हे मंदिर बांधलं जाणार असून त्यात अनेकजण उत्तराखंडमधील आहेत.”
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना रौतेला म्हणाले, “देशातील विविध शहरांमध्ये प्रसिद्ध धामांच्या नावाने अनेक मंदिरं आधीच बांधली गेली आहेत. मग ते इंदूरचं केदारनाथ मंदिर असो किंवा मुंबईचं बद्रीनाथ मंदिर. या मंदिराचं उद्घाटनही उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या हस्ते झालं होतं. उत्तराखंडमधील बाबा केदारनाथ हे कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे आणि कायम राहील. त्यामुळे लोकांच्या विश्वासाशी खेळण्याचा आमचा हेतू नाही.”
वादामागे राजकारण असल्याचा आरोप
सुरेंद्र रौतेला यांनी या संपूर्ण वादामागे राजकारण सुरू असल्याचाही आरोप केला आहे. याविषयी ते पुढे म्हणाले, “आम्ही शंकराचं मंदिर बांधत आहोत. एखाद्या ठिकाणी बाबा भोलेनाथचं मंदिर बांधण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र काही लोक आपल्या राजकीय फायद्यासाठी त्याला केदारनाथ धामशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींचं असंही म्हणणं आहे की बाबा केदारनाथचं मंदिर हे एक ज्योतिर्लिंग आहे, त्यामुळे त्याची दुसरी प्रतिकृती असू शकत नाही. यावर ट्रस्टच्या वतीने मी हे बोलू इच्छितो की 12 ज्योतिर्लिंगांच्या नावावरून देशात अनेक ठिकाणी वेगवेगळी मंदिरं बांधली आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास, मुख्य सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये आहे आणि दिल्लीतही एक सोमनाथ मंदिर आहे. आंध्र प्रदेशात मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे, तर बेंगळुरूमध्येही मल्लिकार्जुन मंदिर आहे. उज्जैनमध्ये काशी विश्वनाथ महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे, तर महाराष्ट्रातील नागपूरमध्येही या नावाचं मंदिर आहे. बद्रीनाथमध्ये भगवान बद्री विशाल यांचं धाम आहे, तर मुंबईतही भगवान बद्री विशाल यांच्या नावाने एक मंदिर बांधण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा या ट्रस्टशी काहीही संबंध नाही, हे मी पुन्हा स्पष्ट करतो.”
वादानंतर मंदिराचं नाव बदलण्याचा निर्णय
दिल्लीतील केदारनाथ मंदिरावरून उत्तराखंडमध्ये जोरदार राजकारण झाल्यानंतर आता आम्ही ट्रस्ट आणि मंदिर दोघांचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असं रौतेला यांनी स्पष्ट केलं आहे. ट्रस्टचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र रौतेला म्हणाले, “काही लोक धाम या शब्दावरून नाराज आहेत. त्यामुळे ट्रस्ट आणि मंदिर या दोघांच्या नावातून धाम हा शब्द काढून टाकला जाईल. त्यासाठीची प्रक्रिया ट्रस्टने सुरू केली आहे.”
दिल्लीमध्ये बनणाऱ्या मंदिराची वैशिष्ट्ये-
- बुरारीमधील मंदिर हे श्री केदारनाथ धाम दिल्ली ट्रस्टकडून बांधण्यात येत आहे
- हे मंदिर तीन एकर परिसरावर बांधलं जात आहे
- या मंदिरासाठी 15 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे
- केदारनाथ धामच्या धर्तीवर हे मंदिर बांधलं जाणार आहे
- हे मंदिर सुमारे तीन वर्षांत तयार होईल
मंदिर आणि धाम यात काय फरक?
ज्या ठिकाणी देवदेवतांची प्राणप्रतिष्ठा होते, त्याला मंदिर मानलं जातं. तर धाममध्ये देवी आणि देवतांचा वास आहे, असं मानलं जातं. केदारनाथ हे उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात स्थित भगवान शंकराचं धाम (निवासस्थान) आहे.
केदारनाथ धामचा इतिहास
केदारनाथ मंदिर हे उत्तर भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. समुद्रसपाटीपासून 3584 मीटर उंचीवर मंदाकिनी नदीच्या तीरावर आहे. ‘केदारखंड’ असं या प्रदेशाचं ऐतिहासिक नाव आहे. केदारनाथ मंदिर हे उत्तराखंडमधील चार धाम आणि पंच केदार यांचाच एक भाग आहे. भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी ते एक आहे. केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली. तर आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचं पुनरुज्जीवन केलं, असं मानलं जातं. दरवर्षी हजारो भक्त बाबा केदारनाथचा आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिरात जातात. 2013 साली उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेलं होतं आणि मंदिर परिसराचंही त्यात मोठं नुकसान झालं होतं. मात्र केदारनाथ मंदिराला धक्का पोहोचला नाही.
मंदिराची पौराणिक आख्यायिका काय?
केदारनाथ मंदिराची लोककथा ही पांडवांशी संबंधित आहे. कुरुक्षेत्र युद्धात पांडवांनी त्यांच्या चुलत भावांचा म्हणजेच कौरवांचा पराभव केला आणि त्यांचा वध केला. या युद्धानंतर त्यांना भ्रातृहत्या, ब्राह्मणहत्या यांसारख्या पापांचं प्रायश्चित्त करायचं होतं. म्हणून ते भगवान शंकराच्या शोधात निघून गेले. आधी ते वाराणसी (काशी) या पवित्र शहरात गेले. परंतु शंकराला पांडवांना टाळायचं होतं. कारण ते कुरुक्षेत्र युद्धातील मृत्यू आणि अप्रामाणिकपणामुळे खूप संतापले होते. म्हणून त्यांनी बैलाचं (नंदी) रुप धारण केलं आणि गढवाल प्रदेशात लपले.
वाराणसीत शिव न सापडल्याने पांडव गढवाल हिमालयात गेले. तिथे भीमाने एक बैल पाहिला आणि तो बैल शिव असल्याचं ओळखळं. भीमाने बैलाला शेपटीने पकडलं. पण बैलाचं रुप असलेले शिव जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही भागांमध्ये पुन्हा प्रकट झाले. केदारनाथमध्ये वशिंड, तुंगनाथमध्ये हात, रुद्रनाथमध्ये चेहरा, मध्यमहेश्वरमध्ये नाभी, पोटाचा पृष्ठभाग आणि कल्पेश्वरमध्ये केस दिसले. शिव पाच वेगवेगळ्या रुपात पुन्हा प्रकट झाल्यामुळे पांडव आनंदी झाले. त्यांनी शिवाची पूजा करण्यासाठी पाच ठिकाणी मंदिरं बांधली. ही पाच स्थळं केदार महापुरुषाची पाच अंग ‘पंचकेदार’ (बद्रिकेश्वर, मध्यमहेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर) या नावाने प्रसिद्ध आहेत.