मोठी बातमी! दिल्ली सरकारमधील दोन मोठ्या मंत्र्यांचा राजीनामा, राजकारणात खळबळ
दिल्लीच्या (Delhi) राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. दिल्ली सरकारमधील दोन मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून (Delhi) एक मोठी बातमी समोर आलीय. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मनीष सिसोदिया सध्या जेलमध्ये आहेत. त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आलीय. ते सध्या रिमांडमध्ये आहेत. विशेष म्हणजे फक्त मनीष सिसोदिया यांनीच नाही तर दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांनीदेखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. दिल्ली सरकारमधील दोन मंत्र्यांना अटक झाल्यानंतरही ते राजीनामा का देत नाही? अशी चर्चा सुरु होती. अखेर या दोन्ही बड्या मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वीकारले आहेत.
मनीष सिसोदिया(Manish Sisodia) यांना दोन दिवसांपूर्वी सीबीआयने अटक केली होती. ते सध्या पाच दिवसांच्या रिमांडमध्ये आहेत. विशेष म्हणजे सिसोदिया हे दिल्लीचे शिक्षण मंत्री देखील होते. पण त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. मनीष सिसोदिया यांच्या विरोधात मद्य घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ते गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. राज्य उत्पादन विभागात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत होता. याप्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु होती. त्यांची दोन दिवसांपूर्वी आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री त्यांना अटक करण्यात आली.
#BreakingNews : मनीष सिसोदिया ने डिप्टी सीएम पद से दिया इस्तीफा#ManishSisodia #AAP pic.twitter.com/mpjhiNx7UQ
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) February 28, 2023
विरोधकांच्या टीकेनंतर केजरीवाल यांनी राजीनामा स्वीकारला
दुसरीकडे सत्येंद्र जैन यांना याआधीच अटक करण्यात आली होती. सत्येंद्र जैन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. अरविंद केजरीवाल यांनी जैन यांचा राजीनामा घेतला नाही म्हणून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. अखेर त्यांचा देखील राजीनामा अरविंद केजरीवाल यांनी स्वीकारला आहे.
मनीष सिसोदिया हे गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. ईडी, सीबीआयकडून सिसोदिया यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी (26 फेब्रुवारी) सिसोदिया यांना अटक करण्यात आली. मध्यंतरी दिल्ली महापालिकेची निवडणूक पार पडलेली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा भरघोस मतांनी यश मिळालं होतं. त्यानंतर मनीष सिसोदिया यांची पुन्हा चौकशी करण्यात आली होती.