दिल्लीत इस्त्राईल दुतावासाजवळ स्फोट झाल्याचा फोन, घटनास्थळी हालचाली वाढल्या
दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या इस्त्राईल आणि हमास युद्ध सुरु आहे. त्यामुळे भारतात असणाऱ्या इस्त्राईलच्या दुतावासाबाहेर पोलिसांकडून सर्व प्रकारची सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. असं असताना अचानक संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास एका फोनवर इस्त्राईल दुतावासाच्या मागे स्फोट झाल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आणि एकच खळबळ उडाली.
नवी दिल्ली | 26 डिसेंबर 2023 : नवी दिल्लीत इस्त्राईल दुतावासाजवळ स्फोट झाल्याचा फोन पोलिसांना आला. नवी दिल्लीच्या चाणक्यपुरी परिसरात संबंधित घटना घडल्याचा दावा फोनवर करण्यात आला. इस्त्राईलच्या दुतावासाच्या मागे असलेल्या एका प्लॉटवर स्फोट झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झालाय. गेल्या एक तासापासून पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा दलांकडून परिसरात तपास सुरु आहे. या घटनेनंतर संशयित असं काहीही आढळलेलं नाही.
दिल्लीच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयात एका अज्ञात इसमाने आज संध्याकाळी 6 वाजता कथित स्फोटाची माहिती दिली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस याप्रकरणी विस्तृत तपासणी करत आहेत.
तीन-चार लोकांनी स्फोटाचा आवाज ऐकला
स्पेशल सेलच्या सूत्रांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, इस्त्राईल दुतावासाच्या मागे एका खाली प्लॉटवर स्फोट झाल्याचा आवाज तीन-चार लोकांना ऐकू आला. पण स्फोट नेमका कोणत्या ऑब्जेक्टमुळे झाला ते अद्याप समजू शकलेलं नाही. दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल याबाबतचा तपास करत आहे. स्फोटोचा आवाज नेमका कशामुळे आला, याचा तपास सुरु आहे.
मुंबईत 11 ठिकाणी स्फोट घडवून आणण्याची धमकी
विशेष म्हणजे आज मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयातही बॉम्बस्फोटाची धमकी देणारं ई-मेल प्राप्त झालं होतं. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेलय आयडीवरुन ही धमकी देण्यात आलीय. आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत, त्या सर्व ठिकाणी बॉम्ब स्फोट घडवून आणू, अशी धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली होती.