दिल्लीचा टूथपेस्ट चोर, उत्तर प्रदेशात पकडला, खुळे नाहीत पोलीस, मामलाच तसा होता…!
उत्तर प्रदेशच्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर दिल्ली पोलीसांनी थेट संतोषचं घर गाठलं.
नवी दिल्लीः महागड्या गाड्या, सोने-चांदी (Gold-Silver) हिऱ्याचे दागिने चोरणारे चोर आणि त्यांच्या अत्यंत शिताफीनं माग काढणारे पोलीस, या घटना आपण आतापर्यंत अनेक ऐकल्या असतील. पण चोराने (Thief) टुथपेस्ट (Toothpaste) चोरलंय आणि ते पकडण्यासाठी दोन राज्यांतील पोलीस कामाला लागलीय… हे कधी ऐकलंय का? नुकतंच समोर आलेलं एक प्रकरणच तसं आहे. दिल्लीत टूथपेस्ट चोरणाऱ्या एका इसमाचा पाठलाग पोलिसांनी असा काही केला.. की थेट उत्तर प्रदेशात जाऊनच त्याची कॉलर पकडली.
घटना दिल्लीची आहे. एका सऱ्हाइत चोराने दिल्लीतून जवळपास २०० पेक्षा जास्त टूथपेस्टचे बॉक्स चोरले. हे बॉक्स घेऊन चोर गेला उत्तर प्रदेशात. त्याच्या गावी. मग काय…… तपास करता करता पोलीस थेट उत्तर प्रदेशात पोहोचले.
माध्यमांतील वृत्तानुसार, कुंवर पाल सिंह पुत्र हरस्वरुप सिंह या व्यक्तीने २२ नोव्हेंबर रोजी दिल्लीत चोरी झाल्याची तक्रार केली. लाहौरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञाता विरोधात तक्रार दाखल झाली होती. टूथपेस्टच्या २१५ पेट्यांची किंमत जवळपास ११ लाख रुपये होती. घटनेचं गांभीर्य पाहून पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला.
घटनास्थळी चौकशी केल्यानंतर सदर चोरी ऊदल कुमार ऊर्फ संतोष यानेच केली असावी, असा संशय पोलिसांना आला. खबऱ्यांकडून माहिती मिळाली. संतोष उत्तर प्रदेशात गावी लपलेला आहे. उत्तर प्रदेशातील खासेपूर बहरामपूर गावात.
उत्तर प्रदेशच्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर दिल्ली पोलीसांनी थेट संतोषचं घर गाठलं. तिथल्या घराची झडती घेतली तेव्हा टूथपेस्टचे बॉक्स आढळले. आरोपी संतोषदेखील पोलिसांच्या हाती लागला. माध्यमांतील वृत्तानुसार, आरोपीने प्लास्टिक शीटमध्ये लपेटून टूथपेस्टचे बॉक्स नेले. जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये.. पण पोलिसांनी अत्यंत वेगाने सूत्रे हलवत या चोराच्या मुसक्या आवळल्या.