Delhi Election : आज होणार दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा
Delhi Election : निवडणूक आयोग आज मंगळवारी दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी ते दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा करु शकतात. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कुठून विधानसभा निवडणूक लढणार आहेत?
दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा आज दुपारी 2 वाजता होणार आहे. निवडणूक आयोग विज्ञान भवनात निवडणुकीच्या तारखांची घोषणा करेल. 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारीला संपत आहे. 2020 साली निवडणुकीची घोषणा 6 जानेवारीला झाली होती. 8 फेब्रुवारीला मतदान आणि 11 फेब्रुवारीला मतमोजणी झाली होती. दिल्ली विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होऊ शकते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या देखरेखीखाली ही शेवटची निवडणूक असू शकते. ते 18 फेब्रुवारीला सेवा निवृत्त होणार आहेत.
निवडणुकीच्या घोषणेनंतर दिल्लीत आदर्श आचार संहिता लागू होईल. सत्ताधारी आम आदमी पार्टीचा प्रयत्न हॅट्ट्रिक करण्याचा आहे. 2015 मध्ये 67 आणि 2020 मध्ये 62 जागा आपने जिंकल्या होत्या. मागच्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजप 10 जागा सुद्धा जिंकू शकलेली नाही. दिल्लीत तिरंगी सामना आहे. आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर आहे. काँग्रेस आणि आप लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते. पण विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची दोन्ही पक्षांनी घोषणा केली आहे.
अरविंद केजरीवाल कुठून निवडणूक लढणार?
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी सुद्धा नवी दिल्लीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे संदीप दीक्षित आणि भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याशी आहे. केजरीवाल मागच्या दोन निवडणुकीत इथूनच जिंकून विधानसभेत गेले. नवी दिल्ली ही VIP सीट आहे. भाजप आणि काँग्रेस दोघांनी आपल्या स्टार नेत्यांना उतरवलं आहे. इथे सामना रंगतदार असणार आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री कुठून निवडणूक लढवतायत?
दुसऱ्याबाजूला मुख्यमंत्री आतिशी कालकाजीमधून विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या अलका लांबा आणि दक्षिण दिल्लीचे माजी भाजप खासदार रमेश बिधूडी यांच्याशी आहे.
दिल्लीत मतदारांची संख्या किती?
निवडणूक आयोगाने सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जारी केली. यानुसार 1 कोटी 55 लाख 24 हजार 858 नोंदणीकृत मतदार आहेत. यात 84 लाख 49 हजार 645 पुरुष मतदार आहेत. 71 लाख 73 हजार 952 महिला मतदार आहेत. 18-19 वर्ष वयोगटातील 2.08 लाख मतदार पहिल्यांदा मतदान करतील.