उपमुख्यमंत्री आणि एक खासदार आधीच तुरुंगात, पाहा या प्रकरणात कसे फसले केजरीवाल?
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्यात अटक होण्याची शक्यता आहे. गुरुवारी संध्याकाळी ईडीचे पथक त्याच्या घरी पोहोचले. ईडीची टीम केजरीवाल यांची चौकशी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या घराबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडी आता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली आहे. यावेळी अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरु असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीने याआधी ९ वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले होते. पण ते चौकशीसाठी हजर होत नव्हते. ईडीच्या अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी हायकोर्टात अर्ज केला होता. पण हायकोर्टाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिलाय. त्यानंतर लगेेच ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहोचले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची टीम केजरीवाल यांचा जबाब नोंदवत आहे. ईडीच्या टीमने त्यांच्या घराची झडतीही देखील घेतली आहे. आता आप पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पण रात्री कोर्ट यावर सुनावणी करणार का याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलीये. आपकडून त्यांना अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे. पण या प्रकरणात दिल्ली सरकारचे काही मंत्री आधीच तुरुंगात आहेत.
गेल्याच आठवड्यात ईडीने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के. कविता यांना ही अटक केली आहे. त्यांच्या आधी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना देखील अटक केली आहे. ते सध्या तुरुंगात आहेत.
दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरण 2021-22 मधील कथित घोटाळ्या प्रकरणी ईडी या प्रकरणात चौकशी करत आहे. ईडीने आतापर्यंत मुख्यमंत्री केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स बजावले होते. गुरुवारी ईडीचे पथक दहाव्या समन्ससह त्याच्या घरी दाखल झाली. अटकेपासून संरक्षण देण्याचे कोर्टाने फेटाळताच ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहोचले.
मुख्यमंत्री केजरीवाल यात कसे अडकले?
ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गेल्या वर्षी २ नोव्हेंबरला पहिले समन्स पाठवले होते. ईडीच्या आरोपपत्रात त्यांचे नाव होते. उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ तयार होत असताना अनेक आरोपी केजरीवाल यांच्या संपर्कात होते, असा त्यांच्यावर आरोप आहे.
भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांचे लेखापाल बुचीबाबू यांचा जबाब नोंदवण्यात आले, त्यात त्यांनी सांगितले की, के. कविता, केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यात राजकीय समज होती. यादरम्यान कविता यांनी मार्च २०२१ मध्ये विजय नायर यांचीही भेट घेतली होती. या प्रकरणातील आणखी एक आरोपी दिनेश अरोरा यानेही केजरीवाल यांची भेट घेतल्याचे ईडीला सांगितले आहे. ईडीचे म्हणणे आहे की वायएसआर काँग्रेसचे खासदार मंगुता श्रीनिवासुलु रेड्डी आणि केजरीवाल यांच्यात अनेक बैठका झाल्या. सीएम केजरीवाल यांनी रेड्डी यांच्या दिल्लीतील दारू व्यवसायात प्रवेशाचे स्वागत केले होते.
चौकशीत बुचीबाबू आणि आरोपी अरुण पिल्लई यांनी उघड केले आहे की ते केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासोबत उत्पादन शुल्क धोरणावर काम करत होते.
- मनीष सिसोदिया 26 फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत.
- संजय सिंह हे 4 ऑक्टोबर 2022 पासून तुरुंगात आहेत.
- के कविता यांना ईडीने 15 मार्च रोजी हैदराबादमधून अटक केली होती.