‘हरियाणात घडलं तेच महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये बघायला मिळेल’, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
"आपल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे लोकं काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते की, आम्ही जिंकणार. मग काय बोलणार? सकाळी 9 वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करुन बसला होता, आता काय-काय बोलावं आणि काय-काय नको, असं त्याला वाटत होतं. मला त्यांना विचारायचं आहे, आता कसं वाटतंय?", असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर महाराष्ट्र भाजपकडून मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजप कार्यालयाबाहेर हरियाणा झांकी आहे, महाराष्ट्र अभी बाकी आहे, असं पोस्टर लावण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका वाढली. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं. हरियाणात आज जसा निकाल समोर आला तसाच निकाल नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात बघायला मिळेल, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. “आज या ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनाया प्रचंड विजयाचा खूप खूप शुभेच्छा देतो. आपले नेते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हरियाणाने विश्वास दाखवला आणि हरियाणात पूर्ण बहुमताचं भाजपचं सरकार तिथे स्थापन होत आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेय
“लोकसभा निवडणुकीनंतर मी सांगितलं होतं की, आम्हाला विरोधी पक्षाने हरवलं नाही. कोणत्याच विरोधी पक्षाने आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती. आम्हाला हरवलं ते चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह. आपण लोकसभा जिंकलो, पण काही जागा कमी झाल्या, याचं कारण फेक नरेटिव्ह होतं. ज्या दिवशी आपल्या लक्षात आलं महाराष्ट्रासहीत देशात आपण ठरवलं की, फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्हने देऊ. पहिली कसोटी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये होती.
‘जे हरियाणात घडलं तेच महाराष्ट्रात…’
“आपल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे लोकं काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते की, आम्ही जिंकणार. मग काय बोलणार? सकाळी 9 वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करुन बसला होता, आता काय-काय बोलावं आणि काय-काय नको, असं त्याला वाटत होतं. मला त्यांना विचारायचं आहे, आता कसं वाटतंय? जनतेशी बेईमानी करुन निवडून आलेले हे लोकं, आता जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जे हरियाणात घडलं तेच महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबर महिन्यात घडलेलं बघायला मिळेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘हरियाणाच्या मतदारांनी सांगून दिलं की…’
“हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीत आपल्याला 10 पैकी 5 जागा मिळाल्या होत्या. आपण या निवडणुकीत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. थेट 50 जागा आपल्याला मिळत आहेत. जवळपास 60 वर्षांनंतर पहिल्यांदा एक पक्ष सतत तिसऱ्यांदा हरियाणाची सत्ता काबीज करत आहे. तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. हरियाणाच्या मतदारांनी सांगून दिलं की, या ठिकाणी फेक नरेटिव्हच्या विरुद्ध मतदान करणार आहोत. त्या ठिकाणी अग्निवीरच्या विरुद्द रान पेटवण्यात आलं. खेळाडूंना पुढे करुन रान पेटवण्यात आलं. जातीपातीची लढाई कशी तीव्र करता येईल याचा प्रयत्न करण्यात आला. समाजात फूट पाडण्यात आली. पण या सर्व गोष्टींना मतदारांनी नाकारलं. पण या सर्व राजकारणापेक्षा आम्हाला मोदींच्या विकासाचं राजकारण हवं हे हरियाणाने आपल्याला सांगितलं”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“या निवडणुकीचा एकच अर्थ आहे की, जनता केवळ मोदींच्या पाठिशी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेता झाल्यानंतर हरियाणाने पहिली सलामी दिली आहे. त्यानंतर दुसरी सलामी महाराष्ट्र देणार आहे. मुर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा विजय आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.