आंदोलनाला विरोध करण्याची देशात नवी इको सिस्टिम सक्रिय; देवेंद्र फडणवीस यांची टीका
आपण श्वास घेतो. आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवत नाही. पण ऑक्सिजन कमी झालं की मग जाणवतं. तसंच सुशासनचं आहे. व्यवस्था करप्ट झाल्यावर मग आपल्याला सुशासनाचं महत्त्व कळतं. मोदींनी हेच सुशासन सांगितलं. याच सुशासनाला लोकांनी मतदान करायचं आहे, असं आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते सुशासन महोत्सवात बोलत होते.
नवी दिल्ली | 9 फेब्रुवारी 2024 : देशात विकासकामांना सातत्याने विरोध होत आहे. विरोध करणाऱ्यांबाबत पंतप्रधानांनी नवी व्याख्या दिली आहे. पंतप्रधानांनी त्यांना आंदोलनजीवी संबोधलं आहे. मला असे अनेक आंदोलनजीवी दिसले. काही पक्ष आंदोलनजीवी आहेत आणि काही लोकही आंदोलनजीवी आहेत. विकासाला विरोध करणारी एक कम्युनिटीच तयार झाली आहे. प्रत्यके प्रकल्पात हे लोक आहेत. आम्ही अधिक खोलात गेलो तर त्यांना पैसाही एकाच ठिकाणाहून मिळत असल्याचं दिसून आलं, असा दावा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने सुशासन महोत्सवाचं आयोजन केलं होतं. त्यात देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत झाली. मुकुंद देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी हा दावा केला. आपल्या देशात विकासाचा विरोध करण्यासाठी एक इको सिस्टीमही तयार झाली आहे. या इको सिस्टिमला आम्हाला तोडावं लागतं. जेव्हा सरकार जनतेला म्हणते, आम्ही तुमचं भलं करतो, तेव्हा विरोधक सरकार तुमचं नुकसान करतंय असं सांगतात. अशावेळी लोकांचा विश्वास विरोधकांवर अधिक बसतो. त्यांना वाटतं सरकारचा यात काहींना काही डाव आहे. त्यामुळे विश्वासहार्यता महत्त्वाची आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोदींनी डिलिव्हरी सिस्टिम बदलली
सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशात मोदींनी जो चमत्कार केला तो म्हणजे देशातील डिलिव्हरी सिस्टिम बदलली. देशात अनेक स्किम झाल्या. पंचवार्षिक योजना झाल्या, गरीबी हटावचे नारे झाले, अनेक योजना झाल्या. हेतू काही असेल पण डिलिव्हरी सिस्टीम करप्ट होती. त्यामुळे सामान्यांना लाभ मिळत नव्हता. मोदींनी आधी या डिलिव्हरी सिस्टिमवर वार केला आणि नवी डिलिव्हरी सिस्टिम तयार केली. त्यात तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केला. चेक अँड बॅलेन्सचाही वापर केला. त्याचं उत्तरदायित्वही दिलं. त्यानंतर या गोष्टीचं लोकशाहीकरणही केलं, असंही फडणवीस म्हणाले.
यालाच सुशासन म्हणतात
मोदी कोणतीही घोषणा करतात तेव्हा ते कोणत्या तरी राज्यात जातात. तिथे मोठा कार्यक्रम करतात. प्रत्येक राज्याला या कार्यक्रमात सामावून घेतात आणि योजनेची घोषणा करतात. मोदींची योजना जेव्हा घोषित होते तेव्हा पहिल्याच दिवशी सात ते आठ कोटी लोकांना माहीत होतं. यालाच सुशासन म्हणतात, असं फडणवीस म्हणाले.