लाचखोरांच्या दुनियेतील किंग, लाच म्हणून मागायचा थेट विमान
आपल्या पदाचा गैरवापर करून फ्लाइंग स्कूलकडून तीन विमाने लाच घेतल्याचा आणि प्रत्येक विमान वेगवेगळ्या शाळांना ९० लाख रुपयांना भाडेतत्त्वावर दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणातील तपासाची व्याप्ती वाढल्याने आणखी अनेक नावे समोर येऊ शकतात.
नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) स्वतःचाच संचालक कॅप्टन अनिल गिल यांना निलंबित केले आहे. कॅप्टन अनिल गिल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. भ्रष्टाचाराचे हे प्रकरण सीबीआय आणि ईडीपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला हे कठोर पाऊल उचलावे लागले. या प्रकरणात नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील काही लोकही रडारवर आहेत.T
टीव्ही 9 ला मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन अनिल गिल यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप आहे. यासोबतच काही विमान कंपन्यांना फायदा करून दिल्याचाही आरोप आहे. सुरुवातीच्या तपासात मंत्रालयाला या संपूर्ण प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले, त्यानंतर हे प्रकरण सीबीआय आणि ईडीपर्यंत पोहोचले. अखेर मंत्रालयाने कॅप्टन अनिल गिल यांना तात्पुरते निलंबित केले आहे.
मंत्रालयातील काही लोक टार्गेटवर
या घटनेत कॅप्टन अनिल गिल व्यतिरिक्त इतर लोकं ही रडारवर आहेत. आरोपांचे स्वरूप पाहता, एएआयजी विमान अपघात तपास गटातील लोकांचाही यात समावेश असू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रशिक्षण शाळेशी संबंधित गंभीर घटनांनंतर ऑडिट सुरू करण्यात आले होते. ज्यामध्ये सर्वांच्या संगनमताने अहवाल कसा बदलला जातो हे उघड झाले. यामध्ये रेड बर्ड फ्लाइंग अॅकॅडमीच्या तपासणीचाही समावेश होता.
कोण आहे कॅप्टन अनिल गिल?
कॅप्टन अनिल गिल हे हरियाणाचे रहिवासी आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण हरियाणातील कर्नाल येथे केले. यानंतर त्यांनी दून व्हॅली इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बॅचलर डिग्री मिळवली.
निनावी तक्रार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजीसीएला नुकताच एक निनावी ईमेल आला होता. या ईमेलमध्ये कॅप्टन गिलवर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले होते. ईमेलनुसार, कॅप्टन गिलने स्कायनेक्स एरोफ्लाइट सोल्युशन्स नावाच्या कंपनीला पाईपर पीए-28 विमानाच्या प्रशिक्षणासाठी चेक रिपब्लिकला पाठवण्यास भाग पाडले.
परकीय चलन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप
कॅप्टन गिलवर विदेशी चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिलने त्याचे टोपणनाव सेबर्स कॉर्पोरेट सोल्युशन्सचा वापर करून विमान उत्पादक कंपनी (ब्रिस्टल एअरक्राफ्ट) यांच्यातील डीलरशीप संबंध कार्यान्वित केले जेणेकरून कमिशन मिळू शकेल. हे कमिशन परकीय चलनात होते
तीन विमानांच्या बदल्यात लाच
गिल यांच्यावर आरोप आहे की त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून फ्लाइंग स्कूलकडून तीन विमाने लाच म्हणून घेतली आणि त्या बदल्यात प्रत्येक विमान वेगवेगळ्या शाळांना 90 लाख रुपयांना भाड्याने दिले. कॅप्टन गिल हा फ्लाइट ट्रेनिंग स्कूलच्या नियमनातही सामील होता जिथे गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात झाले आहेत. निकृष्ट देखभालीमुळे हे अपघात घडले आहेत.