शंभर वर्षांपेक्षा जास्त जुन्या मागणीला मोदी सरकारकडून मंजुरी, महाराष्ट्राला मिळणार नवीन रेल्वे मार्ग
Manmad Indore Railway Project:मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग उज्जैनमधील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांना जोडणार आहे. या मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा-उत्पादकांना बाजारपेठ मिळणार आहे. या मार्गामुळे महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे आणि मध्य प्रदेशातील बरवणी, खरगोन आणि धार या आदिवासी भागांमध्ये नवीन आणि सुधारित कनेक्टिव्हिटी येईल.
Manmad Indore Railway Project: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील शंभर वर्षांपेक्षा जुनी मागणी मंजूर केली आहे. मोदी सरकारने मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. मनमाड ते इंदूर या सुमारे 309 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी पहिले सर्वेक्षण 1908मध्ये झाले होते. त्यानंतर या रेल्वे मार्गांसाठी अनेक वेळा घोषणा झाल्या. परंतु प्रत्यक्षात रेल्वे मार्गाचे काम काही सुरु झाले नाही. 18,036 कोटींचा हा प्रकल्प सोमवारी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला जोडणारा हा मार्ग आहे.
रेल्वे मार्ग तिर्थक्षेत्रांना जोडणार
मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग उज्जैनमधील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांना जोडणार आहे. या मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा-उत्पादकांना बाजारपेठ मिळणार आहे. या मार्गामुळे महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे आणि मध्य प्रदेशातील बरवणी, खरगोन आणि धार या आदिवासी भागांमध्ये नवीन आणि सुधारित कनेक्टिव्हिटी येईल. हा उपक्रम दुर्गम भाग मुख्य प्रवाहात येईल.
कसा असणार रेल्वेमार्ग
- मनमाड-मालेगाव-धुळे- नरडाणा-शिरपूर-सेंधवा आणि इंदूर असा सुमारे 309 किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग
- मनमाड-इंदूर मार्ग 192 किलोमीटर महाराष्ट्रातून जाणार आहे.
- मनमाड-इंदूर मार्गाचा 50 टक्के खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. उर्वरित खर्च महाराष्ट्र, मध्य प्रदेशने प्रत्येकी 25 टक्के करायचा आहे.
काय होणार फायदे
- धुळे, मालेगाव आणि मध्य प्रदेशातील अविकसित भागात औद्योगिकीकरण होऊन विकासाचा मार्ग खुला होईल.
- मनमाडमार्गे मुंबई ते नवी दिल्ली हे अंतर तब्बल 136 किलोमीटर आणि पुणे ते इंदूर हे अंतर 320 किलोमीटरने कमी होईल.
- जोधपूर, जयपूर, उदयपूर या शहरांमधून सुरत-धुळे मार्गाने दक्षिण भारतात जाणार्या गाड्यांचे अंतर जवळपास 200 किलोमीटरने कमी होईल.
- प्रवाशांच्या वेळेची बचत होणारच आहे ; पण रेल्वे बोर्डाचाही इंधनावर होणारा खर्च कपात होऊन दररोज दोन कोटीची बचत शक्य आहे.
धुळ्यात जल्लोष, माजी खासदाराकडून फटाके उडवले
माजी खासदार सुभाष भामरे यांच्या नेतृत्वात फटाके फोडून भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. धुळ्यातील झाशी राणी पुतळ्याजवळ भाजपाच्या वतीने आनंद साजरा करण्यात आला. गेल्या दहा वर्षांच्या खासदारकीच्या कार्यक्रमात रेल्वे मार्ग व्हावा म्हणून आपण प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.