बंगळुरु – गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकातील (Karnataka)राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. राजकीय हत्यांची तीन प्रकरणे ताजी आहेत. या सगळ्यात बंगळुरुतील चामराजपेट येथील इदगाह मैदानावरुन (idgah ground)नवा वाद सुरु झाला आहे. या मैदानात या महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सव (Ganeshotsav)साजरा करण्याची योजना हिंदू संघटनांनी केलेली आहे. मात्र ही जमीन वक्फ बोर्डाची असल्याचा दावा मुस्लीम समुदायाने केला आहे. यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकात गेल्या काही काळापासून धार्मिक तणाव निर्माण होताना दिसतो आहे. हिजाब प्रकरणापासून कर्नाटकात सातत्याने हा वाद अधिकाधिक प्रमाणात दिसतोय. आता स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी आणि गणेशोत्सवासाठीही इदगाह मैदान मिळावे, यासाठी हिंदू संघटना आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
चामराजपेटचे काँग्रेस आमदार जामीर अहमद खान यांनी या ईदगाह मैदानावर कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे ओयाजन होऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. त्याला परवानगी देण्यात येऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र या मैदानावर स्वातंत्र्यदिन साजरा होत असेल तर त्यात उत्साहाने सहभागी होऊ असे त्यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे सरकारने वेगळीच भूमिका घेतली आहे.
या इदगाह मैदानावर स्वातंत्र्यदिनासाठी किंवा गणेशोत्सवासाठी अद्यापपर्यंत कुणी परवानगी मागितलेी नाही अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री आर अशोक यांनी सांगितले आहे. मात्र कोणत्या व्यक्ती वा संस्थेने अशी परवानगी मागितली तर सरकार त्यावर जरुर विचार केरल, असे सांगत त्यांनी काँग्रेसविरोधी भूमिका मांडली आहे.
हिंदूत्ववादी संघटना सनातनने बंगळुरुच्या महापालिकेकडे या इदगाह मैदानात स्वातंत्र्यदिन आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अर्ज दिल्याची माहिती आहे. हे इदगाह मैदान ही सार्वजनिक जागा असल्याचे समानत संस्थेचे के भास्करन यांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे आमदार या मैदानाची परवानगी देणारे कोण, असा प्रश्नही सनातनने उपस्थित केला आहे. याबाबतचा निर्णय महापालिका देणार असून आम्ही त्याची वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान बंगळुरु महापालिकेने वक्फ बोर्डाला या इदगाह मैदानावर त्यांचा ताबा असल्याची कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश दिले आहेत. ही जागा वक्फ बोर्डाची नसून महापालिकेची असल्याची भूमिका महापालिकेची आहे. वक्फ बोर्डाच्या दाव्यासाठी पुरावे मागण्यात आले आहेत.
1999 सालीही या इदगाह मैदानावर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची परवानगी भाजपाला मिळाली नव्हती. या मैदानाऐवजी १० एकरची जागा वक्फ बोर्डाला यापूर्वीच देण्यात आली आहे. अशी माहितीही देण्यात आली आहे. एकूण हे प्रकरण येत्या आठवडाभरात आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.