घरात शेण लावल्याने खरंच उष्णता कमी होते का? वाचा, काय आहे सत्य
शेणाच्या नैसर्गिक वापरामुळे घरांमध्ये हानिकारक सूक्ष्मजीव कमी होतात. घरात स्वच्छ हवा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करायला मदत करणारं हे उपाय, नक्कीच तुमचं घर अधिक आरामदायक बनवतील.

परंपरेत जपलेल्या जुन्या उपायांकडे आजच्या काळात पुन्हा एकदा लोक वळू लागले आहेत. याचं ठळक उदाहरण दिल्लीत पाहायला मिळालं. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये प्राचार्यांनी भिंतींवर शेण लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला सुरुवात झाली. यामागचं कारण सांगताना त्यांनी स्पष्ट केलं की, भिंतींवर शेण लावल्याने उन्हाळ्यात घर अधिक थंड राहतं.
गावाकडील कच्च्या घरांमध्ये यापूर्वीपासून शेणाचा वापर अगदी नैसर्गिक रित्या केला जात होता. माती, गवत आणि लाकडापासून तयार होणाऱ्या भिंती वेळोवेळी खराब होत असल्याने, त्यावर शेण लावण्याची पद्धत रूढ झाली होती. केवळ कमी खर्चिक उपाय म्हणून नव्हे तर, यामध्ये असलेल्या उष्णता नियंत्रित करण्याच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे ही पद्धत खूपच उपयुक्त ठरली होती.
शेण भिंतींवर लावण्याचे फायदे काय ?




शेण भिंतींवर लावल्याने उन्हाळ्यात घर थंड राहण्यास मदत होते, तर थंडीच्या दिवसात घरातील उब टिकवून ठेवण्याचं कामही होतं. परिणामी, घर नैसर्गिक पद्धतीने इन्सुलेट केलं जातं आणि विजेची बचत होण्यास मदत होते. यामुळे ग्रामीण भागातील घरांमध्ये हिटर, कूलर किंवा एअर कंडिशनरची गरजच भासत नव्हती.
फक्त उष्णतेसाठीच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही शेण घराच्या वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणतो. शेणामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड, अमोनिया आणि जैविक घटक हे हवा शुद्ध करण्यात, विषाणू आणि हानिकारक जीवाणू नष्ट करण्यात प्रभावी ठरतात. यामुळे घरात मच्छर आणि इतर कीटकांची संख्या आपोआप कमी होते.
हिंदू धर्मामध्ये शेणाला धार्मिकदृष्ट्या विशेष मान दिला जातो. शेणाचे उपले पूजा-अर्चेच्या वेळी वापरले जातात, तर घर स्वच्छ ठेवण्यासाठी गोमूत्राने छिंपण देखील केलं जातं. परंपरेमध्ये रुजलेला हा सगळा उपयोग, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास देखील अतिशय योग्य असल्याचं सिद्ध होतं.
रसायनांच्या आणि आधुनिक बांधकाम साहित्याच्या युगात, शेणाच्या या नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक उपयोगाकडे पुन्हा एकदा लोकांचं लक्ष वेधलं जात आहे. दिल्लीतून सुरू झालेली ही चर्चा ग्रामीण जीवनशैलीकडे परत जाण्याची एक सकारात्मक दिशा ठरू शकते.