Agneepath scheme: आपल्या पायावर स्वताच्या हाताने कुऱ्हाड मारुन घेऊ नका.., 37 वर्षे सैन्यात काढलेल्या माजी सैनिकांचे तरुणांना आवाहन
या योजनेबद्दल त्यांच्यासारख्या अनेक अनुभवी सैनिकांच्या मनातही शंका आहेत, मात्र याचा अर्थ आम्ही रेल्वे जाळत फिरायचे का, असा सवाल त्यांनी केला आहे. एका सैनिकाला असे कृत्य कधीही पटणारे नाही.
नवी दिल्ली – सैनिकांची भरती करण्यासाठी नव्याने केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath scheme)सध्या पूर्ण देशात विरोध करण्यात(protest in India) येतो आहे. अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने सुरु आहेत. रेल्वे स्टेशनांवर रेल्वे जाळण्यात येत आहेत. लाठ्या काठ्यांनी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करण्यात येते आहे. अनेक ठिकाणी बसेस आणि सार्वजनिक मालमत्तांना आगी लावण्याचे प्रकार घडत आहेत. अशा स्थितीत आता या योजनेचे महत्त्व सांगण्यासाठी सैन्यदलातील माजी अधिकारी, सैनिक पुढे सरसावले आहेत. प्रसिद्ध संरक्षण तज्ज्ञ निवृत्त मेजर जनरल जीडी बक्षी यांनी या प्रकरणात तरुणांना आवाहन केले (Appeal to youth from ex Army Man)आहे. पायावर कुऱ्हाड मारुन घेऊ नका, असे आवाहन त्यांनी देशभरातील तरुणांना केले आहे.
जे तरुण हिंसाचारात आहेत त्यांना संधी मिळूच नये
सैन्यदलात जाणे याचा अर्थ स्वयंशिस्त असा असतो, असे या माजी लष्करी अधिकाऱ्याने सांगितले आहे. जे तरुण जाळपोळ आणि हिंसाचार करत आहेत, त्यांना सैन्यदलात सेवा देण्याबाबत विचारच व्हायला नको, असे बक्षी यांनी म्हटले आहे. देशविरोधी कारवायात सामील होऊन यातरुणांनी स्वताच्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. इतर तरुणांनीही यात सहभागी होऊ नये, असे आवाहनही निवृत्त अधिकारी बक्षी यांनी केले आहे. जर या प्रकरणात या समाजकंटकांविरोधात गुन्हे दाखल झाले आणि पोलिसांच्या तपासणीत हे तरुण जर दोषी सापडले तर सैन्यात जाण्याचा त्यांचा मार्ग कायमचा बंद झालेला असेल, असेही बक्षी यांनी सांगितले आहे.
३७ वर्षै सैन्यदलात असलेल्या अधिकाऱ्याचे आवाहन
सैन्यदलात केवळ स्वयंशिस्त असणाऱ्यांना जागा आहे, असे जीडी बक्षी यांनी स्पष्ट केले आहे. ३७ वर्षे बक्षी सैन्यदलात कार्यरत होते. सैन्यदलात शिस्तीला अत्यंत महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. जर सैनिकाला सांगितले की १८ हजार फूट उंचीवरील शत्रूच्या तोफेला नष्ट करायचे आहे, तर ती तुम्हाला सैनिक म्हणून करावीच लागते, असे त्यांनी सांगितले. एकदा ऑर्डर आल्यानंतर त्यात काही प्रश्न-उत्तरे नसतात. सैन्यदलात दंगेखोरांची गरज नसल्याचेही त्यांनी परखडपणे सांगितले आहे.
तरुणांना काय केले अवाहन
संरक्षणतज्ज्ञ असलेलया बक्षींनी तरुणांना आवाहन केले आहे की – तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता आहे, हे आम्हाला समजते. मात्र जर अशा देशविघातक कारवायात तुमचे नाव आले तर सैन्यदलात जाण्याचे तुमचे स्वप्न हे स्वप्नच राहील. सैनिक होण्याची इच्छा अपूर्णच राहील, हे समजून घ्या. एक म्हातारा सैनिक म्हणून मी आवाहन करतो की, तुमच्या ज्या काही शंका, कुशंका असतील, त्या इतरही अनेक सकारात्मक मार्गांनी सोडवल्या जाऊ शकतात. ट्रेन आणि बस जाळायच्या आहेत, लोकांना मारायचे आहे, तर तुम्ही चुकीच्या क्षेत्रात जाऊ इच्छित आहात. तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारु नका. ही तुमच्या देशाची संपत्ती आहे, ज्याचे तुम्ही नुकसान करीत आहात. विरोध करण्याचा हा मार्गच नाही.
रेल्वे जाळून प्रश्न सुटणार आहे का?
या योजनेबद्दल त्यांच्यासारख्या अनेक अनुभवी सैनिकांच्या मनातही शंका आहेत, मात्र याचा अर्थ आम्ही रेल्वे जाळत फिरायचे का, असा सवाल त्यांनी केला आहे. एका सैनिकाला असे कृत्य कधीही पटणारे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेतील शंका या योग्य जागी मांडण्यात आल्या आहेत, त्याच्यावर समाधान शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. जाळपोळ करुन या प्रश्नांची उत्तरे कदापिही मिळणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. असे करुन तुम्ही कधीही सैन्यात येऊ शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.