वेटिंग तिकीटाबाबत रेल्वेच्या नव्या धोरणाने प्रवाशांची गोची, केली ही मागणी, यापुढे वेटींगची…
मध्य रेल्वेने वेटींगचे तिकीट असून लांबपल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या सुमारे 1,628 प्रवाशांना ट्रेनमधून खाली उतरविले असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. वेटिंगच्या तिकीटाद्वारे प्रवास बेकायदा असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
रेल्वेने वेटिंग तिकीटाबाबत नवीन निर्णय घेतला आहे. जर तुमच्याकडे लांबपल्ल्याच्या ट्रेनची वेटिंगचे तिकीट असेल आणि ते तिकीट कन्फर्म न होताही तुम्ही जर ट्रेनने प्रवास करणार असाल तर यापुढे असा प्रवास निषिद्ध मानला जाऊन तुम्हाला ट्रेनमधून उतरविले जाऊ शकते. यासंदर्भात मध्य रेल्वेने अशा प्रकारात कारवाई सुरु केली आहे. जर लांबपल्ल्याचे तिकीट कन्फर्म नसेल तर तुम्ही त्या तिकीटावर यापुढे प्रवास करु शकणार नाही, त्यामुळे आता प्रवास करताना कन्फर्म तिकीट असेल तर तुम्हाला ट्रेनमध्ये शिरण्याचा अधिकार राहणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रवासात टीसींकडे दंड भरुन प्रवास करण्याची मूभा आता बंद झाली आहे. त्यामुळे आता रेल्वेनेही 100 च्या पुढे वेंटिग लिस्टची तिकीटे जारीच करु नये अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
लांबपल्ल्यांच्या ट्रेनमध्ये विशेषत: उन्हाळी हंगामात तिकीटांची मागणी सर्वाधिक असते त्यावेळी अनेक जण तिकीट कन्फर्म न झाल्याने त्याच तिकीटावर प्रवास करतात. तसेच टीसी दिसला तर दंड भरुन पुढील प्रवास करीत असतात. परंतू अशा प्रकारच्या सवलतीने ट्रेनमधील गर्दी वाढून मूळ आरक्षित तिकीटांच्या प्रवाशांनाच जागा न मिळाल्याचे व्हिडीओ मध्यंतरी सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. रेल्वेच्या आलिशान वंदेभारत एक्सप्रेसमध्ये अशा प्रवाशांनी प्रवास केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मध्य रेल्वेने हा निर्णय जारी केला आहे. या संदर्भात मध्य रेल्वेच्या स्थानकांवर अनाऊन्समेंट देखील होत आहे. परंतू यामुळे रेल्वे प्रवासी नाराज झाले आहे.
100 च्या पुढे प्रतिक्षा यादीची तिकीटे नकोच
रेल्वेने तिकीट देतानाच ठराविक मर्यादेच्या बाहेर वेटिंगचे तिकीट निदान अशा गर्दीच्या हंगामात देऊ नये अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. कारण अशा चार महिन्यांपुर्वी अशा प्रकारची तिकीटे गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षित केली जातात. त्यामुळे अशी तिकीटे रद्द करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे 100 च्या पुढे प्रतिक्षा यादीची तिकीटे रेल्वेने जारीच करु नये. आरक्षणाचा चार्ज रेल्वे अशा मोठी प्रतिक्षा यादी असलेल्या तिकीटांना लावत असते. प्रवासाच्या वेळच्या तीन तासांत ती रद्द केली नाही तर प्रवाशांना रिफंड देखील मिळत नाही. चार महिने रेल्वे प्रवाशांचा पैसा वापरते. त्यामुळे रेल्वेचा फायदा होतो. परंतू प्रवाशांचे नुकसान होते. आता कोकणातील गणेशोत्सव तोंडावर आला आहे. अशा प्रकारे मध्य रेल्वेने हाच न्याय जर कोकणातील चाकरमान्यांना लावला तर प्रवासी आणि टीसीमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.