अधिकारी थकले पण नोटांची बंडल संपत नव्हती, नोटा मोजून-मोजून मशीन जळाली, रेडमध्ये ED च्या हाती लागलं घबाड
अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात ईडीचे 7-8 अधिकारी या नोटांची मोजणी करत होते. सकाळपासून नोटांची ही मोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. नोटा मोजण्यासाठी 6 मशीन्स लावण्यात आल्या.
प्रवर्तन निर्देशालय ईडीला सोमवारी एका रेडमध्ये घबाड हाती लागलय. आलमगीर आलम हे झारखंडमध्ये मंत्री आहेत. त्यांच्या सचिवाच्या नोकराकडे प्रचंड पैसा सापडला आहे. ईडीने आतापर्यंत रेडमध्ये 35.23 कोटी रुपये बेहिशोबी कॅश, फ्लॅट आणि ज्वेलरी जप्त केली आहे. यात 32 कोटी रुपये कॅश आहे. एक अन्य ठिकाणी 3 कोटी रुपये मिळाले आहेत. 500 रुपयाच्या नोटेची इतकी बंडल मिळाली आहेत की, अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात ईडीचे 7-8 अधिकारी या नोटांची मोजणी करत होते. सकाळपासून नोटांची ही मोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. नोटा मोजण्यासाठी 6 मशीन्स लावण्यात आल्या. तीन-तीन खोल्यांमध्ये नोटा मोजणीच काम सुरु होतं. यानंतर ईडीने मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल आणि नोकर जहांगीर आलम यांना रात्री उशिरा अटक केली.
झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरावर सोमवारी सकाळी अचानक ईडीच्या टीमने रेड मारली. त्यावेळी प्रत्येक खोलीत भ्रष्टाचाराचा पैसा सापडला. कपाट, तर बेडच्या खाली लपवून ठेवलेल्या 500 रुपयांच्या नोटांचा डोंगर सापडला. नोटा इतक्या होत्या की, सकाळी सुरु झालेला मोजणीचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत मोठमोठ्या मशीन्स लावून सुरु होता.
नोटांचे डोंगर सापडले
तब्बल 13 तास नोटांची मोजणी सुरु होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी 6 वाजता छापा मारला. मंगळवारपर्यंत ही छापेमारी सुरु होती. 20 तासापेक्षा अधिकवेळ छापेमारी सुरु होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही बातमी समजल्यानंतर त्यांनी निवडणूक प्रचारसभेत काँग्रेसवर निशाणा साधला. झारखंडमध्ये नोटांचे डोंगर सापडतायत, अशी टीका त्यांनी केली.
ईडीला नोटांशिवाय अजून काय-काय सापडलं?
झारखंडमध्ये आलमगीर आलम काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून ते मंत्री आहेत. सचिवाच्या नोकराच्या घरात मिळालेल्या नोटांच्या या बंडलच कनेक्शन मंत्र्यासोबत आहे असा भाजपाचा आरोप आहे. नोटांशिवाय नोकराच्या घरात ट्रान्सफर-पोस्टिंगची सुद्धा कागदपत्र सापडली आहेत. ED ची टीम 4 बॅग घेऊन सचिवाच्या नोकराच्या घरातून बाहेर पडली. ईडीच्या टीमने पेन ड्राइव आणि काही कागदपत्र सुद्घा सोबत नेली. आलमगीर आलम यांची काँग्रेसकडून आमदार होण्याची चौथी वेळ आहे. पाकुडामधून 2000, 2004, 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी आमदारकीची निवडणूक जिंकलीय.