नवी दिल्ली, दि. 5 जानेवारी 2024 | काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याकडे आयकर विभागाने मागील महिन्यात छापे टाकले होते. यावेळी कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी रक्कम मिळाली होती. ही रक्कम मोजण्यासाठी 40 नोटा मोजण्याच्या मशीन आणल्या गेल्या होत्या. 351 कोटींपेक्षा जास्त बेहिशोबी रक्कम त्यांच्याकडे मिळाली होती. या घटनेच्या काही दिवसानंतर हरियाणातील काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार आणि राष्ट्रीय लोकदलचा माजी आमदार दिलबाग सिंह यांच्यासंबधित ठिकाणांवर अमलबजावणी संचालनालय (ईडी) छापे टाकले. गुरुवारी एकाच वेळी 20 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या छाप्यात पाच कोटी रोकड, चार ते पाच किलो सोन्याचे बिस्कीट आणि अवैध विदेशी शस्त्रे मिळाली आहेत. त्यात 300 काडतूस, 100 मद्याच्या बाटल्या आहेत. तसेच त्यांची देशातील आणि विदेशातील संपत्तीची माहिती मिळाली आहेत.
सुरेंद्र पवार हरियाणातील सोनीपत मतदार संघातून निवडून आले आहे. तर दिलबाग सिंह यमुनानगर मतदार संघातून इंडियन नॅशनल लोकदलच्या जागेवर निवडून आले होते. आता ते आमदार नाहीत. सुरेंद्र पवार यांच्या निवासस्थानी मागील 24 तासांपासून ईडीची तपासणी सुरु आहे. ईडीचे अधिकारी अवैध खनिज प्रकरणात तपासणी करत आहेत. तसेच करनाल येथील भाजप नेते मनोज वधवा यांच्याकडे ED ची छापेमारी सुरु आहे. ईडीची टीम यमुनानगरसह फरीदाबाद, सोनीपत, करनाल, मोहाली आणि चंडीगडमध्ये तपासणी करत आहेत.
In Haryana illegal mining case, the Enforcement Directorate is carrying out searches at premises linked to Congress leader Surender Panwar and former INLD legislator Dilbag Singh. Raids are underway at 20 locations in Yamuna Nagar, Sonipat, Mohali Faridabad, Chandigarh and Karnal… pic.twitter.com/N6ukp1yZT2
— ANI (@ANI) January 4, 2024
ईडीचे अधिकारी गुरुवारी सकाळी आठ वाजता पाच वेगवेगळ्या गाड्यांमधून सुरेंद्र पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यापूर्वी बंदोबस्तासाठी सीआयएसएफचे जवान पोहचले होते. अवैध खणन प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या आदेशानंतर ईडीकडून केला जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीला या चौकशीत महत्वाचे पुरावे मिळाले आहे. ईडीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाली. या रोकड रक्कमेची मोजणी सुरु होती. रात्री बारा वाजेपर्यंत पाच कोटी रुपये मोजले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.