PNB घोटाळा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, नीरव मोदीची 29 कोटींची मालमत्ता जप्त
ईडीने पीएनबी घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ईडीने या प्रकरणातील फरार आरोपी नीरव मोदी याची 29 कोटी 75 लाख रुपयांची जंगी मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये स्थावर मालमत्तेसह बँक अकाउंटमधील रक्कमचाही समावेश आहे.
पीएनबी बँक घोटाळा प्रकरणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. ईडीने या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीने या प्रकरणातील फरार आरोपी नीरव मोदी याची 29 कोटी 75 लाख रुपयांची जंगी मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये स्थावर मालमत्तेसह बँक अकाउंटमधील रक्कमचाही समावेश आहे. पीएनबी घोटाळा हा काही वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. जवळपास 6498 कोटी रुपये इतक्या मोठ्या रमकेचा हा घोटाळा होता. या प्रकरणी याआधी सीबीआयने एफआयआर दाखल केली होती. यानंतर आता ईडीने ECIR दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी तपास करत असताना ईडीला नीरव मोदी आणि त्याच्या ग्रुप ऑफ कंपनीच्या कोट्यवधी रुपयांची जमीन आणि बँक अकाउंटची माहिती मिळाली होती. याआधीही ईडीने नीरव मोदीशी संबंधित 2596 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीने सीबीआय, बीएस आणि एफसी शाखा, मुंबई यांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे पीएनबी बँक फसवणूक प्रकरणात भारतीय दंड संहिता 1860 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलमांखाली तपास सुरू केला आहे. नीरव मोदी आणि त्याच्या भारतातील कंपन्यांच्या मालकीच्या 29.75 कोटी रुपयांच्या जमिनी आणि इमारती, तसेच बँक खात्यांमध्ये पडलेले पैसे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जप्त करण्यात आले आहेत.
नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरु
आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 च्या तरतुदींनुसार मुंबईच्या विशेष न्यायालयाकडून (FEOA) 692.90 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच पीडित बँकांना 1052.42 कोटी रुपये यशस्वीरित्या पुनर्संचयित करण्यात आले आहेत. पीएमएलए कोर्टात नीरव मोदी आणि संबंधित संस्थांच्या विरोधात ईडीकडून आधीच तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच फरार आरोपी नीरव मोदी याचं लंडन येथून भारतात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. तो लंडनमध्ये अटकेत आहे.
दरम्यान, नीरव मोदी याने यूके कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्याचा जामिनाचा अर्ज सातव्यांदा फेटाळण्यात आला. सध्या तो ब्रिटनच्या जेलमध्ये बंद आहे. या प्रकरणी चौकशी सुरु आहे. भारत सरकारकडून नीरवच्या भारतात प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. यासाठी भारत सरकारने ब्रिटन सरकारकडे नीरवच्या प्रत्यार्पणासाठी याचिका देखील केली आहे.