मुंबई : देशाचे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्याशी संबंधित रेल्वे नोकरीच्या बदल्यात जमीन देण्याच्या घोटाळ्या प्रकरणी ईडीने (ED) आज मोठी कारवाई केली आहे. ईडीने या प्रकरणी आज दिवसभरात मुंबई, पाटणा, दिल्ली, रांचीसह एकूण 24 ठिकाणी छापेमारी केलीय. या छापेमारीत 1 कोटींची रोख रक्कम, दीड कोटींचे दागिने आणि 1900 यूए डॉलर सापडल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. या छापेमारीदरम्यान ईडीच्या हाती काही कागदपत्रे देखील मिळाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे ईडीला या प्रकरणात मुंबईतील काही संस्थांचेही धागेदोरे सापडले आहेत. या संस्थांनी पैशांच्या व्यवहारात लालूप्रसाद यादव यांना मदत केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.
छापेमारीनंतर ईडीला 600 कोटींच्या अवैध मालमत्तेची माहिती मिळाली. या तापासातून संबंधित प्रकरणात 350 कोटींची अवैध मालमत्ता आणि 250 कोटींचे बँक व्यवहार झाल्याचं ईडीच्या निदर्शनास आलं. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या ताब्यात असणाऱ्या दिल्लीतल्या घराची किंमत रेकॉर्डवर 4 लाख आहे. मात्र त्या घराची मार्केट व्हॅल्यू तब्बल 150 कोटी असल्याची माहिती ईडी तपासातून समोर आलीय.
तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या माध्यमातून रेल्वेत नोकरी देण्याच्या नावाने पाटणा येथील पॉश जमीन हडपण्यात आली, ज्याची आजच्या घडीला 200 कोटी रुपये इतकी किंमत आहे, अशी माहिती तपासातून समोर आलीय. बेनामी संपत्ती ज्यांच्या नावावर आहे आणि शेल कंपनी ज्यांच्या नावावर आहे, ज्यांना याचा फायदा झालाय त्यांची ओळख आता पटलेली आहे, अशीदेखील माहिती समोर आलीय.
दिल्लीतील न्यू फ्रेंड कॉलनीचा बंगला मेसर्स AB एक्सपोर्ट PVT च्या नावावर आहे. विशेष म्हणजे त्यावर तेजस्वी यादव यांच्या कुटुंबियांचं नियंत्रण आहे. कागदपत्रांवर या संपत्तीची किंमत अवघी 4 लाख रुपये इतकी आहे. पण वास्तव्यात या बंगल्याची किंमत दीडशे कोटी रुपये इतकी आहे. दिल्लीतील बंगला, मुंबईतील संपत्ती आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी सर्वाधिक प्रमाणात रोख रकमेचा वापर केला गेल्याची शंका तपास यंत्रणेला आहे.
तपासादरम्यान माहिती समोर आलीय की, साडे सात लाख रुपयांत ग्रुप डीची नोकरी देण्यासाठी एका जमिनीचे चार तुकडे हडपण्यात आले. त्यानंतर संबंधित मालमत्ता ही आरजेडीच्या माजी आमदाराला तीन कोटी रुपयात विकण्यात आली. याबाबतचे पैसे तेजस्वी यादव यांच्या अकाउंटमधून ट्रान्सफर झाले. ईडीच्या दाव्यानुसार, ग्रुप डीमध्ये नोकरी देण्यासाठी गरीब लोकांकडूनही जमीन हडपली गेली. विशेष म्हणजे रेल्वे झोनमध्ये नोकरी मिळवणारे 50 टक्के उमेदवार हे लालू प्रसाद याव यांच्या विधानसभा क्षेत्रातील होते. ईडी या प्रकरणात खोलवर तपास करत आहे. त्यासाठी यादव कुटुंबाने केलेल्या गुंतवणुकीची देखील माहिती ईडीकडून घेतली जात आहे.