CM Eknath Shinde : भावना गवळींविरोधात चौकशी सुरूय तरीही त्या प्रतोद कशा? एकनाथ शिंदे म्हणाले, क्लीनचिट दिलेली नाही!
शिवसेनेच्या खासदारांनी शिंदे गटास समर्थन दिले आहे. यावरून या खासदारांवर दबाव असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, की दबाव आहे की नाही याबाबत आमचे गटनेते बोलतील.
नवी दिल्ली : भावना गवळींविरोधात (Bhavana Gawali) चौकशी सुरू आहे. सध्या त्या प्रतोद आहेत. मात्र चौकशी सुरू असली तरी त्यांना क्लीनचिट दिलेली नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहे. भावना गवळी यांनी शिंदे गटाने प्रतोद म्हणून नेमले आहे. एकीकडे त्यांची चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांना प्रतोद म्हणून नेमले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्षेप घेत टीका केली होती. त्याविषयी एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. संजय राऊत यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. शिवसेनेच्या खासदारांवर दबाव असल्याने त्यांनी शिंदे गटास पाठिंबा दिल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला, त्यालाही एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहेत.
‘खासदारांवर दबाव नाही’
शिवसेनेच्या खासदारांनी शिंदे गटास समर्थन दिले आहे. यावरून या खासदारांवर दबाव असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, की दबाव आहे की नाही याबाबत आमचे गटनेते बोलतील. आणखी कोणी बोलले असते तर दखल घेतली असती. पण जे सकाळी रोज बोलतात, त्यांचा मॅटिनी शो बंद झाला आहे. ते रोज बोलतात. त्याची दखल घेण्याची गरज नाही, असा टोला संजय राऊत यांना शिंदेंनी लगावला. तर भावना गवळी यांचे प्रकरण कोर्टात होते. कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय घेतला आहे. सरकारने त्यांना कोणतीही क्लिनचीट दिली नाही, असे शिंदे म्हणाले.
‘भावना गवळींचा व्हीप चालणार’
उद्धव ठाकरे यांनी सांगितले, की तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. तुमचे योग्य सोर्स वापरा. आम्ही आमचा निर्णय घेतला आहे. आमचे सोर्स वापरले आहेत. एकनाथ शिंदे हे आमचे सोर्स आहेत. 18 खासदारांना भावना गवळींचाच व्हीप लागू होईल, असे शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल शेवाळे यांनी सांगितले. संवैधानिक हक्कातून आम्ही नवा गटनेता निवडला आहे. आम्ही कोणताही गट स्थापन केला नाही, असेदेखील राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.