एकनाथ शिंदे यांनी कवितेने श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध, मोदीही लक्षपूर्वक ऐकत राहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी ९ जून रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार आहे. यासाठी तयारी सुरु झाली आहे. त्याआधी आज एनडीएच्या घटक पक्षांनी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देत त्यांची नेता म्हणून निवड केली.
लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवल्यानंतर आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींना नेता म्हणून एनडीएतील सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. राजनाथ सिंह यांनी प्रस्ताव मांडला. त्याला पक्षाकडून नितीन गडकरी आणि अमित शहा यांनी मान्यता दिली. याशिवाय, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि एकनाथ शिंदे यांसारख्या आघाडीतील अनेक नेत्यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करणारा प्रस्ताव मंजूर केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एका कवितेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना ते म्हणाले की, ते जमिनीपासून येथे आले आहेत आणि प्रत्येकाच्या वेदना समजून घेत आहेत.
एकनाथ शिंदे म्हणाले की, जनतेने विकासाला महत्त्व दिले आहे. विरोधी पक्ष फक्त राजकारण करायचे, त्यांना घरी बसवले आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी देशाला खूप पुढे नेले आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांनीही नरेंद्र मोदींच्या नावाला अनुमोदन देत तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कवितेच्या 4 ओळी सांगितल्या.
मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसे नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने, मृत्यु से जीवन खींचा है। मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, शीशे से कब तक तोड़ोगे। मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे।
पीएम मोदींनी देखील एकनाथ शिंदे यांची ही कविता गांभीर्याने ऐकली. यावेळी नितीश कुमार यांनीही पीएम मोदींची स्तुती केली. ते म्हणाले की, यावेळी काही लोकांनी इकडे-तिकडे काही जागा जिंकल्या आहेत. पुढच्या वेळी तिथेही तुम्ही त्यांचा पराभव कराल याची आम्हाला खात्री आहे. तुमच्या कार्यकाळात बरीच कामे झाली आहेत. देशाच्या आणि बिहारच्या विकासासाठी तुम्ही निर्णय घेत राहाल अशी आशा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनडीएचा नेता म्हणून घोषित केल्यानंतर एनडीएकडून राष्ट्रपतींना पाठिंब्याचे पत्र देखील सादर करण्यात आले आहे. ९ जून रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता पंतप्रधान मोदी यांना शपथविधी होणार आहे.