मोठी बातमी! लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच निवडणूक आयुक्तांचा राजीनामा
आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अरुण गोयल यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. पण त्यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
नवी दिल्ली | 9 मार्च 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीची आता कधीही घोषणा होऊ शकते. ही निवडणूक सर्वात मोठी निवडणूक आहे. असं असताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यांचा कार्यकाळ हा 2027 पर्यंत होता. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदाचा राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगात आधीच निवडणूक आयुक्ताचं एक पद खाली होतं. त्यानंतर आता अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याने आता निवडणूक आयोगात महत्त्वाच्या पदावर केवळ मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत दोन निवडणूक आयुक्त हे देखील प्रमुख पदं असतात. दोन्ही निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिल्याने आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीची जबाबदारी असणार आहे.
निवडणूक आयोगाकडून सध्या देशातील वेगेवगळ्या राज्यांचा दौरा सुरु आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासोबत अरुण गोयल हे देखील विविध राज्यांचा दौरा केला आहे. या दौऱ्यांमधून निवडणुकीची तयारी केली जात आहे. तसेच प्रशासनाकडून काय तयारी करण्यात येत आहे याचा आढावा घेतला जातोय. असं असताना अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिला आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने आपल्या एका अधिसूचनेत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. हा राजीनामा 9 मार्चपासून म्हणजे आजपासून लागू होणार आहे”, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.
अरुण गोयल 1985 च्या बॅचचे IAS
अरुण गोयल हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 18 नोव्हेंबर 2022 ला स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर लगेच निवडणूक आयोगाने त्यांना निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवली. अरुण गोयल यांनी 15 महिने निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली. या दरम्यान गोयल निवडणूक आयुक्त असताना त्यांचं सरकार किंवा मुख्य निवडणूक आयुक्तासोबत वादाची कोणतीही बातमी समोर आलेली नाही.