Elections : 15 वर्षानंतर दोन्ही पक्ष येणार एकत्र, भाजपसोबत करणार युती?
Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. एनडीएला ४०० जागा जिंकता याव्यात यासाठी भाजपने अनेक प्रादेशिक पक्षासोबत बोलणी सुरु केली आहे. भाजपकडून पडद्यामागे अनेक हालचाली सुरु आहेत. कोणता आहे तो पक्ष जाणून घ्या.
मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक समीकरणं जुळू लाागली आहेत. भाजपने आपल्या जुन्या मित्रांना पुन्हा एकदा एनडीएमध्ये आणण्याचं काम सुरु केलंय. भाजपने यासाठी कमिटी नेमली आहे. भारतीय जनता पक्षाने ३७० तर एनडीएला ४०० जागांचे टार्गेट पंतप्रधान मोदींनी ठेवले आहे. त्यामुळे भाजपने कंबर कसली आहे. अब की बार ४०० पारचा नारा दिल्यामुळे भाजपने आता समीकरणं जुळवण्यासाठी पडद्यामागच्या हालचाली सुरु केल्या आहेत. आता भाजप हा बिजू जनता दल सोबत युती करण्याची शक्यता आहे. याचे भाजपला दोन फायदे होऊ शकतात.
ओडिशा युनिटच्या भाजप नेत्यांनी दिल्लीत आज अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्याच दिवशी बीजेडी नेत्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही पक्षांमधील युतीची औपचारिक घोषणा होऊ शकते.
15 वर्षांनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र
बीजेडीचे उपाध्यक्ष आणि आमदार देबी प्रसाद मिश्रा यांनी देखील भाजपसोबत संभाव्य युतीबाबत वक्तव्य केले आहे. नुकत्याच झालेल्या ओडिशा दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी देखील याचे संकेत दिले होते. त्यामुळे 15 वर्षांनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. ओडिशातील नवीन पटनायक सरकारच्या विरोधात पंतप्रधान मोदी कोणतीही टीका केली नाही. पंतप्रधानांनी उलट नवीन पटनायक यांचे कौतुकही केले. त्यांना लोकप्रिय मुख्यमंत्री देखील म्हटले आहे.
बीजेपी आणि बीजेडी युतीची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही. पण जर युती झाली तर जागावाटपाबाबत राज्यातील समीकरण काय असेल, हाही प्रश्न आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपची 14 जागांची मागणी
ओडिशामध्ये लोकसभेच्या 21 जागा आहेत. सध्या बीजेडीकडे 12, भाजपकडे आठ आणि काँग्रेसकडे एक जागा आहे. युती झाल्यास भाजपला आणखी पाच-सहा जागा हव्या आहेत आणि त्या बदल्यात विधानसभेत ते बीजेडीला जास्त जागा देऊ शकतात. सध्या भाजपला लोकसभेच्या 14 जागा हव्या आहेत तर बीजेडीला सात जागा द्यायच्या आहेत.
विधानसभा निवडणुकीबाबत बीजेडीची ही अट
विधानसभा निवडणुकीत बीजेडीला ९५-९७ जागा देण्याचा प्रस्ताव आहे. अशा स्थितीत भाजपकडे 50-52 जागा शिल्लक राहतील. बीजेडीला मोठा वाटा हवा आहे कारण सध्या दोन्ही सभागृहात त्यांची संख्या जास्त आहे. बीजेडीला विधानसभेच्या 102 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत.