EPF Interest Rate : लाखो कर्मचाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका; आता ईपीएफवर मिळणार केवळ 8.1 टक्के व्याज!
केंद्र सरकारनं ईपीएफच्या व्याज दरात मोठी कपात केली आहे. 2021 - 22 साठी आता 8.1 टक्के व्याज मिळणार आहे. ईपीएफवरील व्याज दरात कपात केली जाऊ शकते असा अंदाज यापूर्वीच व्यक्त करण्यात आला होता.
मुंबई : केंद्र सरकारनं ईपीएफच्या व्याज दरात (EPF Interest Rate) मोठी कपात केली आहे. 2021 – 22 साठी आता 8.1 टक्के व्याज मिळणार आहे. ईपीएफवरील व्याज दरात कपात (Interest rate cuts) केली जाऊ शकते असा अंदाज यापूर्वीच व्यक्त करण्यात आला होता. ईपीएफओ बोर्डाचा व्याज दर 8.5 टक्क्यावरुन 8.1 टक्के करण्याचा प्रस्तावाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी पाठिंबा दर्शवलाय. सीतारामण म्हणाल्या की, 40 वर्षात ईपीएफच्या व्याज दरात कपात केली नव्हती. आज व्याज दरात करण्यात आलेली कपात वस्तुस्थिती दर्शवते.
राज्यसभेत बोलताना निर्मला सीतारामण म्हणाल्या की, 40 वर्षात व्याज दरात कपात केली गेली नव्हती. ईपीएफच्या सेंट्रल बोर्डाकडून आजची वस्तुस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान, हा प्रस्ताव अद्याप अर्थ खात्याकडे मंजुरीसाठी आलेला नाही. ईपीएफओने मार्चमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या 230 व्या बैठकीनंतर पीएफवरील व्याज दर 8.1 टक्के करण्यात येईल अशी घोषणा केली होती. हा व्याज दर गेल्या चार दशकातील सर्वात कमी आहे.
कोणत्या आर्थिक वर्षात पीएफवर किती व्याजदर?
- 2015 – 8.75 टक्के
- 2016 – 8.80 टक्के
- 2017 – 8.65 टक्के
- 2018 – 8.55 टक्के
- 2019 – 8.65 टक्के
- 2020 – 8.50 टक्के
- 2021 – 8.50 टक्के
- 2022 – 8.10 टक्के
ईपीएफ व्याजावर लागू होणारे नवे आयकर नियम, पॉईंट टू पॉईंट
- नवीन नियमांच्या नुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याच्या भविष्य निधी खात्यामध्ये जमा होणारे कोणतेही व्याज केवळ 2.50 लाख रुपयांपर्यंतच्या योगदानासाठी कर मुक्त असेल. कर्मचाऱ्यांच्या अडीच लाखांहून अधिक योगदानासाठी कर आकारणी केली जाईल. कर अभ्यासक बलवंत जैन यांच्या मते, आस्थापना कर्मचाऱ्याच्या भविष्य निधीत योगदान करत नसल्यास अशा कर्मचाऱ्यांसाठी कर मुक्त मर्यादा पाच लाख रुपयांची असेल.
- ईपीएफओ द्वारे प्रत्येक वर्षी जाहीर केलेल्या व्याज दरानुसार, पाच लाखांच्या मर्यादेच्या आत 93 टक्के नोकरदारांचा समावेश होतो आणि त्यांना करमुक्त व्याज लाभ प्राप्त होतो.
- आस्थापनांद्वारे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्के ईपीएफ मध्ये योगदान दिले जाते आणि कर्मचाऱ्याच्या वेतनातून 12 टक्के कपात केली जाते. आस्थापनांच्या योगदानापैकी 8.33 टक्के रक्कम कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेत (ईपीएस) वर्ग केली जाते. सदर रकमेवर कोणतेही व्याज मिळत नाही.
- नवीन नियमांत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. अतिरिक्त योगदानावरील व्याज करपात्र असेल. संपूर्ण योगदान कर आकारणीसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
- 31 मार्च 2021 पर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा अतिरिक्त रक्कम कर कपातीसाठी पात्र ठरणार नाही. सर्व योगदान गैर करपात्र योगदान म्हणून ग्राह्य धरले जाईल.
- दुसऱ्या अकाउंटवर (कर योग्य) मिळणाऱ्या खात्यावर प्रत्येक वर्षी कर आकारणी केली जाईल.
- करपात्र खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर योगदान दिलेल्या वर्षासाठीच केवळ आकारणी केली जाणार नाही. अन्य सर्व वर्षांसाठी कर आकारणी केली जाईल.