3 दहशतवाद्यांच्या खात्मा करणाऱ्या जवानाने जिंकली निवडणूक, मंत्र्यांचा पराभव
एका सीआरपीएफ जवानाने निवृत्ती घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपने त्यांना तिकीट दिलं. सीआरपीएफमध्ये अनेक कारवाया करणाऱ्या या जवानाने एका मंत्र्याचा थेट पराभव केला. छत्तीसगडमध्ये या लढतीची जोरदार चर्चा होत आहे.
Assembly election : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. छत्तीसगडमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसचा पराभव झाला आहे. भाजपने तीन राज्यांमध्ये येथे बाजी मारली आहे. भाजपने येथे 90 पैकी 54 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला 35 जागांवर समाधान मानावे लागले आहे. इतरांच्या खात्यात 1 जागा गेली आहे. या निवडणुकीत एका जवानाची देखील चर्चा आहे. यावर्षीच सीआरपीएफमधून स्वैच्छिक निवृत्ती घेतलेल्या कॉन्स्टेबल राम कुमार टोप्पोच्या विजयाची छत्तीसगडमध्ये जोरदार चर्चा होत आहे. 31 वर्षीय टोप्पो यांनी सीतापूर विधानसभा मतदारसंघातून मंत्री आणि काँग्रेस आमदार अमरजीत भगत यांचा 17 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. 1 सप्टेंबर रोजी टोप्पो यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2021 मध्ये त्यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित
टोप्पो यांना छत्तीसगडमधील जगदलपूर येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले. सीआरपीएफने पहिल्यांदाच छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून राज्यात नक्षल समस्या आता नियंत्रणात असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात नक्षलविरोधी कारवायांमध्ये केंद्रीय दल तैनात करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यातही सक्रिय
सीतापूरची जागा 20 वर्षे काँग्रेसकडे होती. टोप्पो हे सीआरपीएफचे जवान तर होतेच पण ते सामाजिक कार्यातही सक्रिय होते. लोकांच्या मनात त्यांनी जागा केली होती. त्यामुळे निवडणुकीत लोकांनी त्यांना संधी दिली.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःची ओळख माजी सैनिक अशी केली आहे. टोप्पो यांना 83088 मते मिळाली. छत्तीसगड सरकारमधील पर्यटन, संस्कृती, अन्न आणि ग्राहक मंत्री भगत यांना 65928 मते मिळाली. टोप्पो यांनी नागालँड, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, केरळ आणि दिल्ली येथे सेवा दिली आहे. 2018-21 मध्ये त्यांनी श्रीनगरमधील सीआरपीएफ कमांडो युनिटमध्येही काम केले.
अनेक कारवायांमध्ये सहभागी
टोप्पो 2018 च्या नागरी निवडणुकांदरम्यान 3 दहशतवाद्यांना ठार करणार्या टीमचा भाग होते. श्रीनगरमध्ये ही चकमक तब्बल 18 तास चालली होती. टोप्पो म्हणाले की, मी 4 वर्षे कमांडो युनिटमध्ये राहिलो. या काळात मी अशा अनेक चकमकीत सहभागी होतो ज्यात दहशतवादी मारले गेले. मी 2018 च्या ऑपरेशनबद्दल बोलू शकतो कारण मला राष्ट्रपतींकडून शौर्य पदक मिळाले आहे. इतर गुप्त ऑपरेशन होते आणि मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. याशिवाय अंतर्गत सुरक्षा आणि निवडणुकांसह जबाबदाऱ्यांसाठी मला तैनात करण्यात आले होते.
लोक जमीन आणि वाळू माफियांना कंटाळले होते. येथे महिला सक्षमीकरण नाही. मी 13 वर्षे गणवेशात देशाची सेवा केली. आता मला नव्या भूमिकेत माझ्या लोकांची सेवा करायची आहे. असं टोप्पो यांनी म्हटले आहे.