Exit Polls 2023 : 3 राज्यांपैकी या 2 राज्यांमध्ये भाजपला बहुमत
नागालँड, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये मतदान पूर्ण झाले असून २ तारखेला निकाल लागणार आहेत. पण त्याआधी वेगवेगळे एक्झिट पोल पुढे आले आहेत. काँग्रेसला पुन्हा एकदा आत्मचिंतन करण्याची गरज भासणार आहे. असं चित्र आहे. भाजपला मात्र दोन राज्यांमध्ये यश मिळताना दिसत आहे.
मुंबई : ईशान्य भारतातील तीन राज्यांमध्ये या महिन्यात निवडणुका पार पडल्या. मतदानाचा आज शेवटचा दिवस होता. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला मतदान झाले होते. यानंतर 27 फेब्रुवारी रोजी मेघालय आणि नागालँड या इतर दोन राज्यांमध्ये मतदान झाले आहे. यानंतर आता एक्झिट पोल समोर येत आहेत. आपण वेगवेगळ्या सर्वेक्षणांवर नजर टाकणार आहोत. एक्झिट पोलनुसार, कोणत्या राज्यात, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे पाहुयात.
त्रिपुरामध्ये पुन्हा भाजप
Aaj Tak च्या एक्झिट पोलनुसार, त्रिपुरामध्ये भाजपला 60 पैकी 36 ते 45 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. एक्झिट पोलनुसार येथे भाजप सरकारमध्ये पुन्हा येण्याची शक्यता आहे. डावे आणि काँग्रेस आघाडीला 6 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे टिपरा मोथा पक्षाला 9 ते 16 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माणिक साहांवर लोकांनी सर्वाधिक विश्वास व्यक्त केला असून ते मुख्यमंत्रीपद वाचवू शकतील, असे सांगण्यात येत आहे.
‘झी मॅट्री’च्या एक्झिट पोलमध्ये त्रिपुरामध्ये भाजप पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला 29-36 जागा मिळण्याची शक्यता आहे. डाव्यांना 13-21 जागांवर आघाडी मिळत आहे. सध्या डावे पक्ष बहुमतापासून कोसो दूर असल्याचे दिसत आहे.
टाईम्स नाऊच्या ईटीजी रिसर्चच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला इतर एक्झिट पोलपेक्षा कमी जागांचा अंदाज आहे. भाजपला 21-27 जागा मिळतील, तर डाव्यांना 18 ते 24 जागा मिळतील असा अंदाज आहे. टाईम्सच्या एक्झिट पोलमध्ये दोन्ही पक्षांमध्ये कांटे की लढत दिसून येत आहे.
नागालँडमध्ये भाजपची सत्ता
इंडिया टुडेच्या अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये नागालँडमध्ये भाजप आणि एनडीपीपी यांच्या युतीला 38 ते 48 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे काँग्रेसला येथे केवळ 1 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. NPF 3 ते 8 जागा जिंकू शकतो.
टाईम्स नाऊ ईटीजी रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि एनडीपीपीच्या युतीला 39 ते 49 जागा मिळत आहेत. काँग्रेसला शून्य जागा दिसत आहे. NPF 4 ते 8 जागा जिंकू शकते.
झी न्युजवर दाखवल्या जाणाऱ्या झी मॅट्रिजनुसार, नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी पुन्हा सत्तेत येतील. भाजप-एनडीपीपी युतीला येथे 35 ते 43 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसला फक्त 1 ते 3 जागा मिळतील असा अंदाज आहे. एनपीपीला शून्य ते एक जागा आणि एनपीएफला 2 ते 5 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. NDPP आणि भाजपला 67% मते मिळण्याची शक्यता आहे.
मेघालयमध्ये एनपीपी आघाडीवर
इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या मते, भाजपला 4 ते 8 जागा मिळतील, तर काँग्रेसला 6 ते 12 आणि एनपीपीला 18-24 जागा मिळण्याची शक्यता आहे. एनपीपी राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. यंदा एनपीपीने स्वबळावर निवडणूक लढवली होती.
टाईम्स नाऊ ईटीजी रिसर्चनुसार भाजप खूपच मागे आहे. येथे भाजपला केवळ 3 ते 6 जागा दाखविल्या आहेत. तर एनपीपीला केवळ 18 ते 26 जागा दाखविल्या जात आहेत. एनपीपीला एक्झिट पोलमध्ये स्पष्ट बहुमत मिळत आहे.
Zee Matrise च्या सर्व्हेनुसार मेघालयमध्ये भाजपला पराभव होताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार, एनपीपीला 21 ते 26 जागा मिळतील, तर भाजपला केवळ 6 ते 11 जागा मिळू शकतात. टीएमसी दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीएमसीला 8 ते 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. मेघालयमध्ये काँग्रेस शेवटच्या क्रमांकावर आहे, पक्षाला केवळ 3 ते 6 जागा मिळू शकतात. मेघालय निवडणुकीत अपक्षांना 10 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. जे आता महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.