Train Accident: सूर्यनगरी एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले, जोधपूरहून वांद्र्याला येत असताना घडला अपघात

| Updated on: Jan 02, 2023 | 6:52 AM

प्रवाशांना मदत पोहोचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी एक ट्रेन रवाना केली आहे, अशी माहिती उत्तर पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे.

Train Accident: सूर्यनगरी एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले, जोधपूरहून वांद्र्याला येत असताना घडला अपघात
सूर्यनगरी एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जोधपूर : राजस्थानमध्ये रेल्वे अपघात झाल्याचं वृत्त आहे. जोधपूरहून वांद्रे टर्मिनसला येणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेसचे 8 डबे रेल्वे रुळावरून उतरले. ही दुर्घटना पालीच्या रजकियावास येथे झाला. या दुर्घटनेत दहा लोक जखमी झाले आहेत. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच रेल्वेचंही कोणतंही नुकसान झालं नसल्याचं वृत्त आहे. रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ प्रवाशांची सुटका केली. तसेच ही संपूर्ण रेल्वे खाली करण्यात येत आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून तोपर्यंत हा मार्ग ब्लॉक करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

आज पहाटे 3.27 वाजता हा अपघात झाला. वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले. रजकियावास-बोमदरा सेक्शनच्या दरम्यान हा अपघात झाला. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्रवाशांना मदत पोहोचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी एक ट्रेन रवाना केली आहे, अशी माहिती उत्तर पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे.

 

तसेच रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत हा मार्ग ब्लॉक करण्यात आला आहे. तसेच सध्या चार एक्सप्रेसचे मार्गही बदलण्यात आले आहेत. या शिवाय प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाचे उच्चअधिकारी घटनास्थळी रवाना होत आहे. अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी हे अधिकारी घटनास्थळी येणार आहे. तसेच जयपूर येथील मुख्यालयातील कंट्रोल रुममधून घटनेवर लक्ष ठेवलं जात आहे.

रेल्वेकडून हेल्पलाइन नंबर जारी

जोधपूर: 0291- 2654979(1072), 0291- 2654993(1072), 0291- 2624125, 0291- 2431646

पाली मारवाड: 0293- 2250324, 0293- 2250138, 0293- 2251072