प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन, डॉक्टरांनी पहिल्यांदाच कारण सांगितलं
राहुल बजाज यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना हार्ट आणि लंग्स संबंधित समस्या असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
मुंबई : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे आज निधन झाले, वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, बजाज समूहाच्या उभारणीमध्ये (Bajaj Group) राहूल बजाज यांचे मोठे योगदान होते. गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान राहुल बजाज यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना हार्ट आणि लंग्स संबंधित समस्या असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. वृद्धापकाळामुळे उपचाराला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. हळहळू त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज अखेर त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बजाज यांच्या निधनाचे वृत्त कळताच उद्योक क्षेत्रातील आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
बजाज यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार
दरम्यान राहुल बजाज यांचे पार्थिव थोड्याच वेळात रुबी हॉल हॉस्पिटलमधून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी आकुर्डी येथील कंपनीत ठेवलं जाणार आहे, त्यानंतर रविवारी संध्याकाळी चार वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
बजाज उद्योग समुह हा देशातील टॉप उद्योग समुहांपैकी एक आहे. बजाज ऑटोला मोठे करण्यात राहुल बजाज यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. बजाज उद्योग समुहाच्या माध्यमातून देशात मोठ्याप्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. राहुल बजाज यांनी या उद्योग समुहाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या कार्याची दखल म्हणून 2001 मध्ये राहुल बजाज यांचा भारत सरकारच्या वतीने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
संबंधित बातम्या
हमारा बजाज मध्यमवर्गीयांच्या घरात पोहोचवणाऱ्या राहुल बजाज यांचं निधन, 83 व्या वर्षी अखेरचा श्वास
राणेंचा लोकसभेत गडबड घोटाळा; केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर, सभापतींनी कसे निस्तारले?