हे राम ! बाबा-महाराजही सुरक्षित नाही, एक कोटी द्या नाही तर आश्रम उडवू; अनिरुद्धाचार्य यांना महाराष्ट्रातून धमकी
प्रसिद्ध भागवत कथाकार अनिरुद्धाचार्य महाराज यांना धमकी देण्यात आली आहे. अनिरुद्धाचार्य यांना आश्रम उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून बदल्यात एक कोटी रुपये मागितले आहेत.
मथुरा : श्रीकृष्णाची नगरी असलेल्या मथुराच्या वृंदावनमध्ये सातत्याने संत आणि धर्माचार्यांना धमक्या मिळत आहेत. काहींना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे, तर काहींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे पोलिसही संतांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून अलर्ट झाले आहेत. पुन्हा एकदा तिर्थनगरी वृंदावनमध्ये एक प्रकरण समोर आलं आहे. प्रसिद्ध भागवत कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराज यांना धमकी देण्यात आली आहे. त्यांचा गौरी गोपाल येथील आश्रम बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे आश्रमात एकच खळबळ उडाली आहे.
अनिरुद्धाचार्य महाराजा यांच्या आश्रमाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यता आली आहे. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यता आली आहे. हे पत्र एक दिवस आधीच आश्रमात मिळालं होतं. अनिरुद्धाचार्य यांना हे पत्र तातडीने द्या असं या पत्रावर लिहिलेलं होतं. आम्ही तुमचा आश्रम बॉम्बने उडवून देऊ. तुम्हाला बर्बाद करू. बऱ्याच दिवसांपासून आम्ही वृंदावनला आलो आहोत. आमचे लोक तुमच्या आश्रमावर नजर ठेवून आहेत. तुमच्या कुटुंबावरही आम्ही नजर ठेवून आहोत. तुम्ही बर्बाद व्हावेत असं आम्हाला वाटत नाही. आमची एक कोटीची मागणी एका आठवड्यात पूर्ण करा. नाही तर तुमच्या कुटुंबासोबत जे होईल त्याला तुम्हीच जबाबदार असाल, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.
पोलिसात जाल तर…
या पत्रात पुढे पोलिसात न जाण्यासही सांगितले आहे. जर तुम्ही पोलिसांना माहिती दिली तर तुमच्यासाठी ते चांगलं होणार नाही, अशी धमकीही या पत्रातून देण्यात आली आहे. हे पत्र वाचल्यानंतर आश्रमच्या मॅनेजरने अनिरुद्धाचार्य महाराज यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर वृंदावन पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार करण्यात आली. वृंदावन पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
महाराष्ट्रातून धमकी
अनिरुद्धाचार्य महाराज यांना महाराष्ट्रातून हे धमकावणारं पत्रं आलं आहे. या पत्रावर संजय पटेल असं नाव लिहिलेलं आहे आणि महाराष्ट्रातील पत्ता आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ चौकशी सुरू केली आहे. हे पत्र महाराष्ट्रातूनच आलंय की कुणी खोडसाळपणा केलाय याची माहिती घेतली जात आहे. तसेच संशयितांचीही चौकशी केली जात आहे. ज्याने पहिले पत्र पाहिले त्याच्याकडूनही माहिती घेतली जात आहे, असं सूत्रांनी सांगितलं. अनिरुद्धाचार्य महाराज हे वृंदावनच्या बाहेर आहेत. मात्र, त्यांना या प्रकाराची कल्पना देण्यात आली आहे.