रांची, दि. 30 डिसेंबर 2023 | बँकेच्या खात्यात कधी दहा हजारापेक्षा जास्त रक्कम नसताना एक कोटी रुपये आले तर काय होणार? त्या व्यक्तीला हे पैसे कसे आले ? याचा धक्का बसणार, हे निश्चित. कधी बँकेकडून चुकीने टाकली गेली रक्कम असेल तर ती पुन्हा वर्ग केली जाते. एका 75 वर्षीय शेतकऱ्याचे भारतीय स्टेट बँकेत बचत खाते आहे. त्याचे वृद्ध पेन्शन योजनेचे हे खाते आहे. त्या खात्याचे पासबुक गेली चार, पाच महिन्यांपासून भरले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्याने पासबुक बँकेतून भरुन आणण्यासाठी मुलाकडे दिले. मुलाने जेव्हा पासबुक भरुन आणले आणि शेतकऱ्याने पहिले तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसला. कारण बँकेच्या खात्यात एक कोटी रुपये जमा झाले होते. बिहारमधील भागलपूर येथील शेतकरी संदीप मंडल यांच्यासंदर्भात हा प्रकार घडला.
संदीप मंडल यांनी आपल्या खात्यात एक कोटी आल्याची माहिती बँकेला जाऊन दिली. बँकेने त्वरित त्याचे खाते फ्रीज केले. त्यानंतर शेतकऱ्याने सायबर पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार नोंदवली. सायबर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. बँकेने सायबर पोलिसांकडून रिपोर्ट आल्यावर खाते पुन्हा सक्रीय करणार असल्याचे म्हटले आहे.
संदीप मंडल यांचे एसबीआयमधील खात्यात वृद्ध पेन्शन आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे निधी येतो. या खात्यात एक कोटी आले कसे, यासंदर्भात आपणास काहीच माहिती नसल्याचे शेतकरी संदीप मंडल यांनी सांगितले. आपण ऑगस्ट महिन्यात पासबुक अपडेट केले होते. त्यावेळी खात्यात 8400 रुपये होते. त्यानंतर पासबुक अपडेट केले नाही. खात्यात एक कोटी रुपये आल्यानंतर बँकेने खाते फ्रीज करत सायबर पोलिसांकडे तक्रार देण्याचे सांगितले. त्यानुसार तक्रार देण्यात आली आहे, असे संदीप मंडल यांनी म्हटले. डीएसपी सुनील कुमार पांडे यांनी म्हटले की, शेतकऱ्याच्या खात्यात एक कोटी रुपये आले कसे? याची चौकशी सुरु केली आहे. बँकेने त्यांचे खाते गोठवले आहे. बँकेकडून आम्हाला यासंदर्भात पत्र मिळाले आहे.