बँकेत नोकरी करून वडिलांनी 4 मुलांना शिकवले, सर्व भावंडे UPSC उत्तीर्ण होऊन झाले IAS-IPS
एका कुटुंबातील चार सदस्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून हे सर्वजण आयएएस आणि आयपीएस पदांवर कार्यरत आहेत.
लालगंज, UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो जण या परीक्षेत आपले नशीब आजमावतात. पण संधी मात्र काहींनाच मिळते. भारतात UPSC परीक्षा उत्तीर्ण होणे ही मोठी गोष्ट मानली जाते. समाजात त्यांना प्रचंड मान-सन्मान असताे. एकाच कुटुंबातील चार भाऊ-बहीण एकत्र या कठीण परीक्षेत (Four Siblings Crack UPSC) उत्तीर्ण झाले. उत्तर प्रदेशातील लालगंज जिल्ह्यातील ही घटना आहे. येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील चार सदस्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून हे सर्वजण आयएएस आणि आयपीएस पदांवर कार्यरत आहेत.
हे चौघे भावंड असून त्यात दोन भाऊ आणि दोन बहिणींचा समावेश आहे. त्यांचे वडील बँक कर्मचारी आहेत. अनिल प्रकाश मिश्रा यांनी आपल्या मुलांच्या या यशाबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक असूनही त्यांनी मुलांच्या शिक्षणाबाबत कधीही तडजोड केली नाही. आपल्या मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात अशी त्यांची नेहमीच इच्छा होती. अशा परिस्थितीत मुलांनीही अभ्यासाकडे लक्ष दिले आणि मेहनतीपासून कधीच मागे हटले नाही.
मोठा भाऊ आहे IAS
चार भावंडांमध्ये सर्वात मोठा योगेश मिश्रा हा आयएएस अधिकारी आहे. त्यांनी आपले प्रारंभिक शिक्षण लालगंज येथे पूर्ण केले आणि नंतर मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी पूर्ण केली. शिक्षण घेतल्यानंतर योगेशने नोएडामध्ये नोकरी करत नागरी सेवेची तयारी केली. 2013 मध्ये त्याच्या मेहनतीला फळ मिळाले आणि तो UPSC परीक्षा उत्तीर्ण झाला.
योगेश यांच्यानंतर त्यांची बहीण क्षामा मिश्रा यांनीही त्यांच्यासारखी नागरी सेवा निवडली आणि त्यासाठी परिश्रमपूर्वक तयारी केली. पहिल्या तीन प्रयत्नात ती अपयशी ठरली पण तरीही तिने हिंमत हारली नाही आणि चौथ्या प्रयत्नात ती परीक्षा उत्तीर्ण झाली. आता क्षामा आयपीएस अधिकारी आहे.
वडिलांना आहे सर्वांचा अभिमान
यानंतर दुसरी बहीण माधुरी मिश्रा लालगंज येथील महाविद्यालयातून पदवीधर झाली आहे. त्यानंतर प्रयागराजमधून मास्टर्स केल्यानंतर त्याने 2014 मध्ये UPSC परीक्षा दिली. आता ती झारखंड केडरची आयएएस अधिकारी बनली आहे. चार भावंडांमधील दुसऱ्या भावाने 2015 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि अखिल भारतीय 44 वा क्रमांक मिळवला. आता ते बिहार केडरमध्ये कार्यरत आहेत.