Fengal Cyclone : रात्र वैऱ्याची! संकट घोंघावतंय, पाऊस रौद्ररुप धारण करणार, ‘या’ राज्यांमध्ये मोठा अलर्ट

| Updated on: Nov 27, 2024 | 8:19 PM

Fengal cyclone storm : बंगालच्या उपसागरात प्रचंड नैसर्गिक हालचाली सुरु आहेत. समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर होत असल्याने त्याचे परिणाम बघायला मिळत आहेत. तामिळनाडूत पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. हे चक्रीवादळ पुढच्या काही तासांमध्ये जास्त रौद्ररुप धारण करणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढणार आहे.

Fengal Cyclone : रात्र वैऱ्याची! संकट घोंघावतंय, पाऊस रौद्ररुप धारण करणार, या राज्यांमध्ये मोठा अलर्ट
रात्र वैऱ्याची! संकट घोंघावतंय, पाऊस रौद्ररुप धारण करणार
Follow us on

भारतीय किनारपट्टीवर पुन्हा एकदा चक्रीवादळ धडकणार आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील सर्वसामान्य नागरिकांची धाकधूक वाढली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व काळजी घेतली जात आहे. प्रशासन गरज असेल त्या परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांची पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. चक्रीवादळ, पाऊस आणि थंडी या सर्वच गोष्टींचा विचार करुन प्रशासनाकडून नियोजन केलं जात असल्याची माहिती आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीपासून चक्रीवादळाचा वेग वाढणार आहे. या चक्रीवादळाचं नाव फेंगल असं आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं आता चक्रीवादळात रुपांतर होत आहे. आज रात्री त्याचं रुपांतर चक्रीवादळात होईल. यावेळी वाऱ्याचा वेग 60 ते 70 किमी प्रती तास इतका असणार आहे.

हे चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत पुढच्या दोन दिवसांनी श्रीलंकेच्या किनाऱ्याला समांतर स्पर्श करत तामिळनाडूच्या दिशेला येणार आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वाऱ्याचा वेग वाढण्याचा अंदाज आहे. तमिळनाडू, पदुच्चेरी, आंध्र प्रदेश, यनम आणि रायलसीमा या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच आजपासून 4 दिवस पावसाचा हाहा:कार सुरु राहणार असल्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. अंदमान-निकोबार येथे देखील 30 नोव्हेंबरला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

वाऱ्याचा वेग आज रात्रीपासून वाढणार

मिळालेल्या माहितीनुसार, बंगलच्या खाडीत दक्षिण-पश्चिम भागात आणि श्रीलंकेच्या किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग आज रात्रीपासून वाढण्याची शक्यता आहे. या भागात वाऱ्याचा वेग आज रात्रीपासून 60 ते 70 किमी प्रतीतास असा वाढणार आहे. हा वेग उद्या सकाळी 65 ते 75 किमी प्रतीतासापर्यंत पोहोचणार आहे. तसेच त्यानंतर उद्या दुपारपर्यंत कदाचित 85 किमी प्रतीतासाच्या वेगापर्यंत वाढणार असल्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रावर काय परिणाम होईल?

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचं रुपांतर वादळात झालं आहे. हे वादळ कालपासून 10 किमी प्रतीतासाच्या वेगाने पुढे सरकत आहे. पण पुढच्या सहा तासात त्याचं रुपांतर मोठ्या चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. सध्या ते श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळून जात आहे. पुढच्या दोन दिवसात ते तामिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तामिळनाडूत वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. तिथे पुढच्या तीन ते चार दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वादळाचा महाराष्ट्रावर काही परिणाम पडेल का? हे आताच सांगणं कठीण आहे. पण महाराष्ट्रात यामुळे तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यभरात थंडी वाढण्याची शक्यता आहे.