गुजरातमध्ये तापाने वाढवल्या चिंता, 4 मुलांसह 12 जणांचा मृत्यू
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील लखपत तालुक्यात 12 वर्षाखालील चार मुलांसह 12 जणांचा एका धोकादायक आजारामुळे मृत्यू झाला आहे. काही स्थानिक जिल्हा पंचायत सदस्यांचे म्हणणे आहे की, पीडित रुग्णांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. लोकांना ताप येत असल्याच्या तक्रारी होत्या.
पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुसळधार पाऊस आणि पुराच्या उद्रेकानंतर आता पसरलेल्या गूढ तापामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. या तापावर डॉक्टर उपचार करू शकत नसल्याचे स्थानिक जिल्हा पंचायत सदस्यांनी सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, मृत्यूचे कारण निमोनाइटिस असल्याचे दिसून आले, जरी याची पुष्टी झालेली नाही. कच्छचे जिल्हाधिकारी अमित अरोरा म्हणाले, तालुक्यात वैद्यकीय सेवेत वाढ झाली आहे. H1N1, स्वाइन फ्लू, क्रिमियन-काँगो ताप, मलेरिया, डेंग्यूचा धोका लक्षात घेऊन नमुने गोळा केले जात आहेत.
न्यूमोनायटिस हा मृत्यूला कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याचे दिसून येत नाही. या मृत्यूचे मुख्य कारण न्यूमोनाइटिस असल्याचे मानले जात आहे. तापामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. कच्छ जिल्हा पंचायत सदस्य मीनाबा जडेजा यांनी गुजरात काँग्रेसचे प्रमुख शक्ती सिंह गोहिल यांना लिहिलेल्या पत्रात दावा केला आहे की 3 सप्टेंबरपासून बेखडा, सानंद्रो, मोरगर आणि भारवंध गावात तापामुळे 12 लोकांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हाधिकारी अमित अरोरा म्हणाले की, आजूबाजूच्या गावांमध्ये वैद्यकीय सेवा वाढवण्यात आल्या आहेत. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवलं जात आहे. 22 पथके आणि डॉक्टर तैनात करण्यात आले आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी सर्व लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि त्यांच्या तब्येतीत कोणतीही गडबड जाणवताच तज्ज्ञांचा त्वरित सल्ला घ्यावा.
एका रुग्णाला अहमदाबादला पाठवण्यात आले. परंतु, रुग्ण तापातून बरा होऊ शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. रुग्णांना ताप, सर्दी, खोकला, न्यूमोनिया झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता, तर दुसरे जिल्हा पंचायत सदस्य मामद जंग जाट म्हणाले की, डॉक्टर या आजारावर योग्य उपचार करू शकले नाहीत, ज्यामुळे मृत्यू झाला.