झांसीमध्ये नवजात बालकांच्या वॉर्डाला आग, आतापर्यंत 8 बालकांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील झाशी येथे शुक्रवारी एक धक्कादायक घटना समोर आलीये. शहरातील वैद्यकीय महाविद्यालयातील बालकांच्या वॉर्डात आग लागली असून त्यात अनेक मुले भाजल्याची माहिती आहे. आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला असून अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर आहेत.
महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी रात्री आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे नवजात बालकांच्या वॉर्डात दाखल आठ नवजात बालकांचा मृत्यू झालाय. त्यांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील निक्कू (न्यू बॉर्न इंटेन्सिव्ह केअर युनिट) वॉर्डमध्ये सुमारे डझनभर मुलांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. रात्री 11.40 वाजण्याच्या सुमारास वॉर्डात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या आणि मुख्य दरवाजा धुराच्या लोटाने व्यापला होता, त्यामुळे आत जाणं शक्य होत नव्हतं. अग्निशमन दलाच्या जवानांनी वॉर्डच्या खिडकीच्या काचा फोडून आत पोहोचून गंभीररीत्या भाजलेल्या 8 मुलांना बाहेर काढले आहे. या मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
उत्तर प्रदेशातील झाशी येथे शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. मुलांना वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 50-60 मुलांना बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.