आजोबासोबत तलावावर गेले, दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले ते आलेच नाही; वाचवायला गेलेले तिघेही बुडाले
गुजरातमध्ये अत्यंत धक्कादायक आणि दुर्देवी घटना घडली आहे. पोहायला गेलेले दोन तरुण तलावात बुडाले. या दोघांना वाचवायला गेलेले तिघेही बुडाले आहेत.
अहमदाबाद : गुजरातमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. गुजरातच्या बोटाद जिल्ह्यातील तलावात बुडून पाच मुलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. रेस्क्यू टीमही घटनास्तळी पोहोचली. मात्र, या पाचही मुलांना वाचवण्यात त्यांना यश आलं नाही. ही पाचही मुलं 16-17 वर्षाची आहेत. काल ही घटना घडली.
बोटाद शहरातील कृष्णा सागर तलावात ही घटना घडली. दोन मुलं आपल्या आजोबांसोबत बोटाद तलाव पाहण्यासाठी पोहोचले होते. तलाव पाहत असताना या मुलांनी पोहण्याचा हट्ट धरला. आम्हाला तलावात जाऊ द्या, पोहू द्या असा आग्रह त्यांनी धरला. मुलांच्या हट्टामुळे आजोबांनी अखेर त्यांना पोहण्याची परवानगी दिली. पण किनाऱ्यावरच थांबा, लांब जाऊ नका, अशा सूचनाही आजोबांनी दिल्या. आजोबांकडून परवानगी मिळाल्यानंतर या मुलांनी तलावात उड्या घेतल्या आणि स्नानाचा आनंद घ्यायला सुरुवात केली.
वाचवायला गेले अन्…
तलावात अंघोळ करत असताना ही मुलं अचानक खोल पाण्यात गेले. त्यामुळे ही दोन्ही मुलं बुडू लागली. त्यांनी वाचवण्यासाठी धावा केला. हा तीन मुलांना बुडताना पाहून तलावावर असलेल्या तीन मुलांनी कसलाही विचार न करता या खोल पाण्यात उडी घेतली. या मुलांना वाचवण्यासाठी गेलेले ही तीन मुलेही बुडाली. पाचही मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला, अशी माहिती बोटाचे पोलीस अधिक्षक किशोर बलोलिया यांनी सांगितलं.
यापूर्वी अशी घटना घडली नाही
या तलावात बुडालेली सर्व मुले ही 16-17 वर्षाचे आहेत. सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेप्रकरणी या मुलांच्या आजोपबांची साक्षही नोंदवली गेली आहे. कृष्णा सागर तलावात ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, तिथे मोठ्या प्रमाणावर लोक अंघोळीसाठी जात असतात. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. यापूर्वी असा प्रकार झाला नव्हता, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. या ठिकाणी काही उपाययोजना करण्याची गरज आहे. या परिसराला साखळदंडाचा वेढा घातला पाहिजे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.