माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती बिघडली, एम्स रुग्णालयात दाखल
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची अचानक प्रकृती बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची एक स्पेशल टीम मनमोहन सिंह यांच्यावर उपचार करत आहे.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची एक स्पेशल टीम मनमोहन सिंह यांच्यावर उपचार करत आहे. मनमोहन सिंह हे सध्या 91 वर्षांचे आहेत. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. याआधी देखील त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंह यांना फुफ्फुसात इन्फेक्शन झालं आहे. त्यांना श्वसनास त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. काँग्रेसची उद्या बेळगावात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी हे बेळगावात गेले होते. पण मनमोहन सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसची बेळगावातील सभा रद्द करण्यात आली आहे. तसेच मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी दिल्लीच्या दिशेला रवाना होणार असल्याची माहिती आहे.
मनमोहन सिंह यांनी 2004 ते 2014 या काळात काँग्रेस नेतृत्वातील यूपीए सरकारमध्ये पंतप्रधान म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच 1991 ते 1996 या काळात पी. वी. नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मनमोहन सिंह अर्थमंत्री होते. विशेष म्हणजे मनमोहन सिंह यांनी 1991 मध्ये उदारीकरणाच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाची मोठी आर्थिक वृद्धी झाली. या निर्णयाने भारतात परतीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आली. मनमोहन सिंह यांच्या कारकीर्दीने देशाला खूप चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. त्यामुळे भारतीय राजकारणात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं.
मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ इथून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. तर ते 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.