G-20 | 3 महिन्यापासून सुरु आहे तयारी, कशी आहे भारतात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी सुरक्षा व्यवस्था
G-20 Summit : भारतात २० राष्ट्राचे प्रतिनिधी पोहचणार आहेत. जी-२० परिषद ऐतिहासिक ठरणार आहे. चीन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष मात्र पोहोचणार नाहीयेत.
G-20 India : जी-20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात येणार आहेत. जो बायडेन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते शनिवार आणि रविवारी शिखर परिषदेला उपस्थित राहतील. या तीन दिवसीय दौऱ्याची गेल्या अनेक आठवड्यांपासून तयारी सुरू आहे. जो बायडेन यांच्या सुरक्षेसाठी व्हाईट हाऊसचे सुरक्षा रक्षक देखील तैनात असणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्याच कारने प्रवास करणार आहेत. यावेळी प्रत्येक हालचालींवर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाईल.
जो बायडेन यांची सुरक्षा कशी असेल?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिथे जातात तिथे त्यांची स्वतःची सुरक्षा असते. जी-20 साठीही असेच असणार आहे. नवी दिल्लीत एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, जिथून जो बायडेन यांच्या संपूर्ण मार्गावर नजर ठेवली जाईल. महागडी वाहने, शस्त्रे, गोळ्या आणि सुरक्षेशी संबंधित अनेक वस्तू याआधीच येथे आणण्यात आल्या आहेत.
एका वृत्तानुसार, जो बायडेन यांच्या या दौऱ्यासाठी गेल्या २-३ महिन्यांपासून तयारी सुरू आहे. व्हाईट हाऊसचे अधिकारी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाशी बराच काळ संपर्कात होते, जिथून संपूर्ण नियोजन सुरू होते. नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून संपूर्ण संपर्क यंत्रणा तयार केली जाणार आहे. सर्व सुरक्षा रक्षक, राष्ट्राध्यक्षांचे पथक येथून संपर्कात राहणार असून, याशिवाय वैद्यकीय पथकही कार्यरत राहणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कुठे राहतील?
अमेरिकन सरकारने यासाठी भारताच्या सुरक्षा यंत्रणांशीही संपर्क साधला आहे. कारण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा संपूर्ण दौरा मिनिटाला मिनिटाला ठरवला जातो, अशा परिस्थितीत हा संपर्क आवश्यक आहे. आपल्या 3 दिवसांच्या दौऱ्यात जो बायडेन केवळ पंतप्रधानांचे निवासस्थान आणि प्रगती मैदानाला भेट देणार आहेत. जो बायडेन दिल्लीतील हॉटेल आयटीसी मौर्यामध्ये राहणार असून, याआधी भारतात आलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्षही याच हॉटेलमध्ये राहिले आहेत.
अहवालात दावा करण्यात आला आहे की सुमारे 400 हॉटेल खोल्या बुक करण्यात आल्या आहेत, जो बायडेन येथे प्रेसिडेंशियल सूटमध्ये राहतील. याआधी त्यांच्यासोबत अमेरिकेची फर्स्ट लेडी जिल बायडेन येणार होत्या. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे त्यांच्या येण्याबाबत अजूनही शंका आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीत स्वतःच्या कारमधून येतील. ज्याला द बीस्ट म्हणतात. या कारची किंमत दीड लाख डॉलर्सपेक्षा जास्त आहे. या कारवर बंदुकीची गोळी असो की बॉम्ब कोणताच फरक पडत नाही.
ताफ्यात 15 ते 25 वाहने
G-20 शिखर परिषदेचे ठिकाण असलेल्या प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे जाणाऱ्या प्रत्येक देशाच्या प्रमुखांच्या ताफ्यात 14 पेक्षा जास्त गाड्या नसतील, परंतु अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्याला या बाबतीत थोडीशी शिथिलता मिळू शकते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात धावणाऱ्या गाड्यांची संख्या 15 ते 25 असू शकते.
जर यूएस सीक्रेट सर्व्हिस आणि स्थानिक एजन्सींना कोणताही धोका वाटत असेल, तर वर्ग 3 किंवा त्याहून अधिकच्या धमक्यांवर कारवाई केली जाते. म्हणजेच, अशा लोकांना अगोदर अटक केली जाते, जे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी धोका बनू शकतात. याशिवाय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जिथून जावे लागते, त्या मार्गावर स्निफर डॉगद्वारे वारंवार तपासणी केली जाते.
जर आपण G-20 शिखर परिषदेबद्दल बोललो तर त्याची मुख्य शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर होणार आहे. येथे भारत मंडपम बांधण्यात आला आहे, ज्यामध्ये G-20 शी संबंधित सर्व बैठका होणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या परिषदेत सहभागी होणार नसले तरी त्यांचे प्रतिनिधी येथे येणार आहेत. तसे, या बैठकीत सहभागी होण्यासाठी 30 हून अधिक देश आणि संघटनांचे प्रमुख येत आहेत.