गोव्यात वादावादी, थेट मुख्यमंत्र्यांनाच घेरलं; काय घडलं नेमकं?
गोव्यात सँकेलिममध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वाखालील सरकार आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर स्थानिकांचा रोष निर्माण झाला आहे.
गोव्यात सँकेलिममध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे भाजप नेतृत्वाखालील सरकार आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर स्थानिकांचा रोष निर्माण झाला आहे. पालखी उत्सवाच्यावेळी रुद्रेश्वर मंदिरात दोन गटात बाचाबाची झाली. त्यावेळी पोलिसांनी ज्या पद्धतीने हस्तक्षेप केला, त्यावर या स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत हा प्रकार घडल्याने भाजपचीही डोकेदुखी वाढल्याचं सांगितलं जात आहे.
सँकेलिममध्ये पालखी उत्सवावेळी भंडारी समाज आणि काही लोक आमनेसामने आले होते. त्यावेळी पोलिसांनी ज्या पद्धतीने हस्तक्षेप केला, त्या पद्धतीवर भंडारी समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकाराला मुख्यमंत्री प्रमोद सावंतच जबाबदार असल्याचा आरोप या समाजाने केला आहे. पोलिसांच्या उपस्थितच आमच्यावर इतर समाजाच्या लोकांनी हल्ला केला. त्यामुळे मोठा वाद झाला. पण पोलिसांनी परिस्थिती हाताळण्याऐवजी परिसरातील पावित्र्यालाच बाधा आणल्याचा आरोप या समुदायाने केला आहे.
विरोधकांचा सवाल
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे समाज नाराज झाला आहेच, शिवाय विरोधकांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. गोव्याचे आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. एवढा मोठा राडा होत असताना पोलीस बघ्याची भूमिका का घेत होते? पोलिसांच्या बेपर्वाईमुळेच दोन समाजात वादावादी झाल्याचा आरोप अमित पालेकर यांनी केला आहे.
तोच प्रकार गोव्यात सुरू
पोलिसांचं हे कृत्य अत्यंत वाईट आहे. केवळ एका समाजाच्या विरोधातील नसून हिंदू संस्कृतीच्या विरोधातील आहे. जेव्हा वाद झाला तेव्हा पोलीस त्या ठिकाणी होते. त्यांनी दोन गटांना शांत करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. त्यावरून राज्यात काय चाललंय हे समजून येतं. ज्या प्रकारे देशभरात हिंदू समाजात फूट पाडली जात आहे, तोच प्रकार गोव्यात सुरू आहे, असा दावा पालेकर यांनी केलाय. लोकसभा निवडणुकीत एखाद्या समुदायाला त्रास देण्याचं कारण काय? असा सवाल करतानाच आता या समुदायाने भाजपसोबत न राहण्याचा निर्णय घेतला आहे, असही त्यांनी सांगितलं.
असं घडायला नको
गोव्याच्या काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनील कावथंकर यांनीही सरकारवर टीका केली आहे. एवढी मोठी सुरक्षा असूनही दोन गटात वाद होणं हे दुर्देवी आहे. सामाजिक एकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्यात धार्मिक विभाजन करण्याचा प्रयत्न योग्य नाही. लोकसभा निवडणुका सुरू असताना असे प्रकार राज्यात घडायला नको. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, असं सुनील कावथंकर यांनी म्हटलं.
दरम्यान, या घटनेनंतर नाराजीचे सूर उमटत आहेत. भाजपकडून मनोभंग झाल्याचं सांगितलं जात आहे. भंडारी समाज हा गोव्यातील महत्त्वाचा घटक आहे. या समाजाचा निवडणुकीत मोठा प्रभाव असतो. राज्यातील राजकीय वाऱ्याची दिशा फिरवण्याची ताकद या समाजात आहे. पण सँकेलिममध्ये झालेल्या घटनेमुळे गोव्यातील परिस्थिती बिघडली आहे.