गोवा : महाराष्ट्रात जसं ठाकरे विरोधात (Uddhav Thackeray) बंड करून शिंदे गट (Eknath Shinde) तयार झाला आणि नवं सरकार स्थापन झालं. तसाच काँग्रेसचा एक गट गोव्यात फुटणार (Goa Coongress) असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाल्या. मात्र त्यानंतर आमदारांनी आपल्या प्रतिक्रिया बदलल्यानंतर ते बंड शांत झाल्याचेही बोलले जाऊ लागलं. हा गट सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याच्याही चर्चा सुरू होत्या. मात्र ऐनवेळी सगळा प्लॅन फसला, काँग्रेसने एक्शन मोडमध्ये येत विरोधी पक्षनेत्याचीही पदावरून हकालपट्टी केली होती. तसेच इतर आमदारांवरही काँग्रेस कारवाईच्या तयारीतहोती. यावेळी गोवा काँग्रेस प्रभारींनी विशेष लक्ष घातले होते. आता मात्र राष्ट्रपती निवडणुकीच्या आधी काँग्रेस सावध झाली आहे, कारण राष्ट्रपती निवडणुकीआधी पुन्हा बंड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
गोव्यात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मुहूर्तावर काँग्रेसचे आमदार फुटण्याच्या भेटीने काँग्रेसने आपले पाच आमदार तातडीने चेन्नईला नेले आहेत. गोव्यात पाच दिवसांपूर्वी फसलेल्या ऑपरेशन लोटसची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. चेन्नईला नेलेल्या पाच आमदारांमध्ये संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, रुडाल्फ फर्नांडिस, ऍड कार्लोस फरेरा, एल्टन डिकॉस्टा या पाच नावांचा समावेश आहे. हे पाच आमदार सोमवारी राष्ट्रपती निवडणुकीवेळी मतदानासाठी गोव्यात दाखल होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
काँग्रेसचे गोव्यातलं बलाबल पाहिल्यास काँग्रेसचे गोव्यात 11 आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर भाजपने मोठा विजय मिळवत या ठिकाणी पुन्हा सत्ता स्थापन केली होती. ज्यावेळी आमदार फुटण्याच्या तयारीत होते, त्यावेळी आमदारांना आकडा आडवा येत होता, पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदारांची फुटीसाठी आणि नव्या गटासाठी गरज असल्याने गेल्या आठवड्यात गोव्यात ऑपरेशन लोटस ऐनवेळी फसलं होतं. मात्र त्याची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे.
गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेत्यांसह काही आमदार हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी दिसून आले होते. मात्र कोणताही आमदार माझ्या संपर्कात नाही. मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे हे आमदार माझ्याकडे कामासाठी आले होते. आमच्यात इतर कोणत्याह विषयावर चर्चा झाली नाही. अशी माहिती प्रमोद सावंत यांनी दिली होती. तर काँग्रेसच्या मुख्यालयातील बैठकीलाही काही आमदार अनुपस्थित होते.