लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. सात टप्प्यात देशात निवडणुका होणार आहेत. पण त्याआधीच भाजपसाठी गुडन्यूज आली आहे. कारण भाजपच्या पाच उमेदवारांच्या विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने त्यांचा विजय निश्चित झाला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये मतदानापूर्वीच सीएम पेमा खांडू यांच्यासह भाजपच्या ५ उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. या उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवाराने अर्ज भरला नाही. अरुणाचल प्रदेशमध्ये 19 एप्रिलला विधानसभेच्या 60 जागांसाठी मतदान होणार आहे.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू मुक्तो यांचा विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध विजय होण्याची अपेक्षा आहे. एवढेच नाही तर भाजपचे अनेक उमेदवार विविध विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध विजयी होणार आहेत.
अरुणाचल प्रदेशातील पापम परेमध्ये विरोधी पक्षाकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरलेला नाही. अशा 5 जागांवर सत्ताधारी पक्षाचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
याशिवाय तालिमधून जिक्के ताको, तालिहामधून न्यातो दुकोम, सागलीमधून रातू टेची आणि रोईंग विधानसभा मतदारसंघातून मुचू मिठी हेही बिनविरोध विजयी होतील. ३० वर्षे सागली येथून आमदार म्हणून काम केलेले माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते आलोमधून निवडणूक लढवत आहेत.
2019 मध्ये सत्ताधारी भाजपने अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 41 जागा जिंकून सत्ता कायम ठेवली होती. याशिवाय जनता दल (युनायटेड) 7 जागा, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) ने 5 आणि काँग्रेसने 4 जागा जिंकल्या होत्या. उर्वरित 2 जागा अपक्षांना मिळाल्या होत्या.
अरुणाचल प्रदेशचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी लिकेन कोयू म्हणाले, “आम्ही कोणी बिनविरोध जिंकला आहे की नाही याची पुष्टी शनिवार नंतरच करु शकणार आहोत. कारण राज्यात विविध भागातून अर्ज अजून येत आहेत. गुरुवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. शनिवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतरच विजयाची घोषणा करता येईल.