Google Map : गुगल मॅपवर बदललं देशाचं नाव; सर्च केल्यावर पहा काय दिसतंय?
गेल्या काही दिवसांपासून 'इंडिया' आणि 'भारत' या नावांवरून देशात वाद सुरू आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये संविधान दुरुस्तीद्वारे 'इंडिया' हा शब्द वगळून देशाचा उल्लेख केवळ 'भारत' असा केला जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जात होती.
मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 | सरकारने देशाचं नाव ‘इंडिया’वरून ‘भारत’ करण्याचे संकेत दिले होते. त्यावरून बरंच राजकारणसुद्धा झालं होतं. ‘इंडिया’ हे देशाचं इंग्रजी नाव बदलून अद्याप अधिकृतरित्या ‘भारत’ करण्यात आलं नाही. मात्र गुगल मॅपने या नव्या नावाचा आधीच स्वीकार केल्याचं पहायला मिळतंय. जर तुम्ही गुगल मॅपवरील सर्च बॉक्समध्ये ‘भारत’ असं टाइप केलात तर तुम्हा ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून तिरंगा झेंडा दिसून येईल. तुम्ही तुमच्या गुगल मॅपची भाषा हिंदी किंवा इंग्रजी ठेवली असली तरी त्याने काहीच फरक पडत नाही. जर तुम्ही भारत असं हिंदी किंवा इंग्रजीत टाइप केलं तरी तुम्हाला गुगल रिझल्ट म्हणून ‘इंडिया’च दिसेल. याचाच अर्थ गुगल मॅपने इंडिया आणि भारत या दोन्ही शब्दांना ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून मान्यता दिली आहे.
गुगल मॅपवर सर्च करून पहा..
युजर्सना जर भारताचा अधिकृत नकाशा गुगल मॅपवर पाहायचा असेल तर ते इंग्रजी किंवा हिंदीत गुगल मॅपवर भारत किंवा इंडिया असं लिहून सर्च करू शकतात. या दोन्ही शब्दांचं एकच उत्तर गुगल मॅप देतंय. गुगल मॅपच्या हिंदी व्हर्जनवर जर तुम्ही भारत असं टाइप करत असाल, तर तुम्हाला भारताच्या नकाशासोबतच ‘भारत’ असं बोल्डमध्ये लिहिलेलं दिसून येईल. जर तुम्ही गुगल मॅपच्या इंग्रजी व्हर्जनमध्ये ‘Bharat’ असं टाइप करत असाल, तर तुम्हा सर्च रिझल्टमध्ये देशाच्या नकाशासोबतच ‘India’ असं लिहिलेलं दिसून येईल. म्हणजेच गुगल मॅपने भारताला इंडिया म्हणून स्वीकारलं आहे. एकीकडे सरकारने देशाचं नाव बदलण्याचे संकेत दिले असतानाच आता गुगलनेही आपला होमवर्क सुरू केला आहे.
विशेष म्हणजे फक्त गुगल मॅप्सच नाही, तर टेक कंपनीच्या इतर प्लॅटफॉर्म्सवरही तुम्ही जर भारत किंवा इंडिया टाइप करत असाल, तर दोन्हींचं उत्तर एकच मिळेल. गुगल सर्च, गुगल ट्रान्सलेटर, गुगल न्यूज यांसारख्या ॲप्सवर जाऊन भारत किंवा इंडिया लिहिलं, तरी त्याचं उत्तर एकच मिळतंय. याबाबतीत अद्याप गुगलकडून कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.