अविश्वसनीय ! 16 हजार रुग्णांची हार्ट सर्जरी करणाऱ्या डॉक्टरचा हार्ट अटॅकने मृत्यू; रात्री झोपायला गेले ते उठलेच नाही
16 हजार रुग्णांच्या हार्टची सर्जरी करून त्यांना जीवनदान देणाऱ्या एका निष्णात डॉक्टरचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं आहे. गौरव गांधी असं या कार्डिओलॉजिस्टचं नाव आहे. त्यांच्या निधनामुळे मेडिकल फॅटर्निटीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जामनगर : गुजरातच्या जामनगरमधील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. गौरव गांधी यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी गांधी यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गांधी हे हार्ट स्पेशालिस्ट होते. असं असताना त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गांधी यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले आहेत.
डॉ. गौरव गांधी यांनी नेहमीप्रमाणे सोमवारीही दिवसभर रुग्णांना तपासले. काही सर्जरीही केली. रात्रीही रुग्णांना तपासून ते घरी गेले. पॅलेस रोडवरील त्यांच्या राहत्या घरी आले आणि जेवण करून थोड्यावेळाने ते झोपायला गेले. त्यांच्या चालण्याबोलण्यात काहीच बदल नव्हतं. नेहमीप्रमाणे ते हसतमुख होते. त्यांची प्रकृतीही ठणठणीत होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी पहाटे 6 वाजता त्यांचे कुटुंबीय त्यांना उठवायला गेले. त्यावेळी ते झोपेतून उठले नाहीत.
झोपेतच मृत्यू
बराचवेळ प्रयत्न करूनही ते झोपेत न उठल्याने घरचे लोक घाबरले. त्यांनी तात्काळ गांधी यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गौरव गांधी यांनी त्यांच्या वैद्यकीय करीअरमध्ये 16 हजाराहून अधिक रुग्णांच्या हार्टची सर्जरी केली होती. त्यांचाच मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याने जामनगरच्या मेडिकल फॅटर्निटीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गांधी यांचा हार्ट अटॅकनेमृत्यू कसा होऊ शकतो? याचं कोडं डॉक्टरांना पडलं आहे.
स्ट्रेस न घेण्याचा सल्ला द्यायचे
गौरव गांधी प्रत्येकाला स्ट्रेस न घेण्याचा सल्ला द्यायचे. ते स्वत:ही स्ट्रेस घेत नव्हते. मग त्यांचा हृदयविकाराने कसा मृत्यू होऊ शकतो? असा सवाल गांधी यांचे नातेवाईक करत आहेत. गांधी यांनी जामनगरमधून एमबीबीएसची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी एमडीची डिग्री घेतली होती. कार्डिओलॉजीचे शिक्षण त्यांनी अहमदाबादमधून घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी जामनगरमध्येच प्रॅक्टिस सुरू केली होती.
काही काळातच ते सौराष्ट्रातील लोकप्रिय डॉक्टरांमध्ये गणले गेले. रुग्णांना त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास होता. त्यांनी अवघ्या काही वर्षातच 16 हजार रुग्णांच्या हार्टची सर्जरी करण्याचा विक्रम केला होता. फेसबुकवरून सुरू असलेल्या हाल्ट हार्ट अटॅक या मोहिमेशीही ते संबंधित होते. सोशल मीडिया आणि सेमिनारमधून ते लोकांना हृदयविकारापासून सावध राहण्याचा सल्ला देत होते.