Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी मशीदीप्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी, पक्षकारांना मिळाले महत्वाचे फोटो आणि व्हिडिओ
आता पक्षकारांच्या हाती यात काही व्हिडिओ आणि फोटो लागल्याचे सांगण्यात येत आहे. आज पुन्हा कोर्टात दोन्ही बाजुंनी घमासान युक्तीवाद झाला आहे. अयोध्येतील बाबरी मशीदीप्रमाणे आता हे प्रकरण गाजताना दिसत आहे.
वाराणसी : सध्या संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या ज्ञानवापी मशीदीप्रकरणी (Gyanvapi Masjid Case) पुढील सुनावणी 26 मे रोजी होणार आहे. तसेच जसं जसं हे प्रकरण पुढे सरकतंय. तशी आणखी काही महत्वाची माहिती हाती लागत आहे. आधी या मशीदीचा सर्वे रिपोर्ट (Survey Report) तयार करण्यात आला. त्यात अनेक बाबी हाती लागल्या होत्या आणि आता पक्षकारांच्या हाती यात काही व्हिडिओ आणि फोटो लागल्याचे सांगण्यात येत आहे. आज पुन्हा कोर्टात दोन्ही बाजुंनी घमासान युक्तीवाद झाला आहे. अयोध्येतील बाबरी (Babri) मशीदीप्रमाणे आता हे प्रकरण गाजताना दिसत आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांना एका आठवड्यात ज्ञानवापीच्या सर्वेक्षण अहवालावर आक्षेप नोंदवण्यास मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणाशी संबंधित सर्व याचिका सत्र न्यायालयातून जिल्हा न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेशा यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे 45 मिनिटं ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता.
ज्ञानवापी मशीद प्रकरणावर हिंदू पक्षाच्या काय मागण्या आहेत?
- शृंगार गौरीच्या रोजच्या पूजेची मागणी
- वजुखान्यात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या पूजेची मागणी
- नंदीच्या उत्तरेकडील भिंत तोडून डेब्रिज हटवण्याची मागणी
- शिवलिंगाची लांबी, रुंदी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षणाची मागणी
- वजुखान्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी
मुस्लिम पक्षाची मागणी काय?
- कत्तलखाना सील करण्यास विरोध
- ज्ञानवापी सर्वेक्षण आणि 1991 कायद्यांतर्गत प्रकरणावर सवाल
हिंदू पक्ष आज कोर्टात काय म्हणाला?
हिंदू सेनेने या प्रकरणात पक्षकार बनवण्याची विनंती करताना ज्ञानवापीचा संपूर्ण परिसर हिंदू पक्षांना पूजेसाठी द्यावा, असे म्हटले आहे. काशी हे महादेवाचे शहर असून ते अबाधित क्षेत्रही आहे. सर्व पक्षकारांचे मत घेऊन जागा निश्चित करून अन्यत्र मशीद बांधण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती अर्जात न्यायालयाला करण्यात आली आहे. हिंदू बाजूच्या वतीने जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयाकडे अशी मागणी करण्यात आली होती की, न्यायालयाने आधी सर्वेक्षणादरम्यान जमा झालेले पुरावे पाहावेत आणि त्यानंतर पुढील कार्यवाही कशी करायची याचा निर्णय घ्यावा.
आणखी एक याचिका दाखल
सर्वेक्षणादरम्यान ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंदू सेनेने ही याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण दिवाणी न्यायाधीशाकडून जिल्हा न्यायालयात वर्ग केले. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता 25 ते 30 वर्षांचा अनुभव असलेल्या वरिष्ठ न्यायमूर्तींनी या प्रकरणाची सुनावणी करणे योग्य ठरेल, असे न्यायालयाने म्हटले होते.