सज्ज राहा… औषधे, खाटा, ऑक्सिजन सर्व सज्ज ठेवा, नीती आयोगाचे सर्वच राज्यांना आदेश; H3N2चा धोका वाढला
देशभरात H3N2 विषाणूची प्रकरणे वाढली असून त्यापार्श्वभूमीवर नीती आयोगाने राज्यांना रुग्णालयांमध्ये सज्जता, मनुष्यबळ, औषध, वैद्यकीय ऑक्सिजन आणि उपकरणे यांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
नवी दिल्ली : देशभरात H3N2 व्हायरसचा (virus) प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाने (niti aayog) ही परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व राज्यांना व्हायरसचा सामना करण्यासाठी रुग्णालये सुसज्ज असतील हे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. विषाणूचा सामना करण्यासाठी सर्वप्रथम लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
विषाणूचा सामना करण्यासाठी रुग्णालयांमध्ये सज्जता, मनुष्यबळ, औषध, वैद्यकीय ऑक्सिजन आणि उपकरणे यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पावले उचलली जातील यावर नीती आयोगाच्या बैठकीत चर्चा झाली. इन्फ्लूएंझा विषाणूचा सामना करण्यासाठी आयोगाने कोरोनासारख्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात राज्यांनाही सूचना जारी केल्या जातील. आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. नाक व तोंड झाकणे, तसेच गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क वापरावा सल्ला देण्यात आला आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे. लक्षणे असलेल्या लोकांच्या संपर्कात येऊ नका आणि लक्षणे आढळल्यास चाचणी घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. तसेच ज्या जिल्ह्यात रूग्ण आढळले आहेत त्या जिल्ह्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला कळवावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
दरम्यान डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, H3N2 संक्रमित रुग्णांमध्ये फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे यासारखी लक्षणं जाणवतात. यावेळी फ्लू असलेल्या रुग्णांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागत आहे. याचं संक्रमण वेगाने होत असल्याचं दिसून आलं आहे. कमी प्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींना या विषाणूची बाधा लवकर होऊ शकते. रुग्णाचा ताप दोन ते तीन दिवसात जातो. मात्र खोकला किमान दोन आठवडे राहतो. सुरुवातीला ओला खोकला आणि त्यानंतर कोरडा खोकला येतो. सततच्या खोकल्यामुळे शरीरात जास्त थकवा जाणवतो.