‘कोरोनानंतर आता H3N2 व्हायरसचा कहर, देशातील मृतांचा आकडा 6 वर, कोणत्या कोणत्या राज्यावर घोंगावतंय संकट?
H3N2 विषाणूच्या प्रकोपामुळे संपूर्ण देशाची चिंता वाढली असून कोरोनाच्या प्रकोपातून तीन वर्षांनी देश सावरत असतानाच आता या नव्या इन्फ्लूएंझाची प्रकरणे समोर येत आहेत.
नवी दिल्ली : कोरोनानंतर आता H3N2 (इन्फ्लूएंझा विषाणू) ने देशभरात पाय पसरवायला सुरूवात केली आहे. H3N2 या विषाणूमुळे देशभरात आत्तापर्यंत 6 लोकांचा (6 Deaths) मृत्यू झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कर्नाटक, पंजाब आणि हरियाणा येथे या व्हायरसमुळे नागरिक मृत्यूमुखी पडल्याची पुष्टी झाली आहे. मात्र, प्राथमिक तपासात ही बाब समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, H3N2 मुळे मृत्यूचे कारण (cause of death) निश्चित करण्यासाठी अधिक तपास करणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, कर्नाटकातील हसनमध्ये H3N2 विषाणूमुळे एका व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. एच गौडा असे मृत रुग्णाचे नाव आहे. ते 82 वर्षांचे होते. 24 फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 1 मार्च रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. 6 मार्च रोजी IA अहवालात H3N2 ची पुष्टी झाली आहे.
H3N2ने वाढवली देशाची चिंता
H3N2 इन्फ्लूएंझाच्या उद्रेकाने देशभरात चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या प्रकोपातून तीन वर्षांनी देश सावरत असतानाच आता या नव्या इन्फ्लूएंझा (H3N2 विषाणू) ची प्रकरणे समोर येत आहेत. देशात या विषाणूचा झपाट्याने फैलाव होत असून त्या पार्श्वभूमीवर राज्या-राज्यांत सतर्तकतेचा इशारा देण्यात आला असून रुग्णांची व्यवस्था रुग्णालयांमध्येही करण्यात येत आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत अनेक जण या व्हायरसमुळे प्रभावित होत आहेत. मात्र यामुळे घाबरण्याचं काही एक कारण नाही. फक्त बाहेर पडताना मास्क लावून जावे, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. तसेच जर एखाद्या व्यक्तीला सर्दी खोकला किंवा तापाची लक्षणं दिसत असतील तर त्यांच्यापासून दूर राहा.
रुग्णांमध्ये कशी लक्षणं दिसतात ?
डॉक्टरांच्या सांगण्यावनुसार, H3N2 संक्रमित रुग्णांमधये फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे यासारखी लक्षणं जाणवतात. यावेळी फ्लू असलेल्या रुग्णांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागत आहे. याचं संक्रमण वेगाने होत असल्याचं दिसून आलं आहे.