अहमदाबाद: हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसच्या (congress) पदाचा आणि सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिल्याने गुजरात काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अत्यंत खरमरीत पत्रं लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी काँग्रेसच्या राज्य नेतृत्वावर टीका केली आहे. तसेच गुजरात, गुजराती माणसाचा अपमान, गुजरातच्या समस्या आणि गुजरातींकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टीकोण यावरून त्यांनी काँग्रेसला घेरलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटेल यांनी गुजराती अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पटेल यांनी या पत्रातून जाता जाता काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्यावरही टीका केली आहे. पटेल यांनी नाव न घेता राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आज मैं हिम्मत करके कांग्रेस पार्टी के पद और पार्टी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा देता हूँ। मुझे विश्वास है कि मेरे इस निर्णय का स्वागत मेरा हर साथी और गुजरात की जनता करेगी। मैं मानता हूं कि मेरे इस कदम के बाद मैं भविष्य में गुजरात के लिए सच में सकारात्मक रूप से कार्य कर पाऊँगा। pic.twitter.com/MG32gjrMiY
— Hardik Patel (@HardikPatel_) May 18, 2022
श्रीमती सोनिया गांधीजी,
विषय: काँग्रेस पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणे बाबत.
अनेक प्रयत्नानंतरही काँग्रेस पक्षाकडून देश हित आणि समाजाच्या हिताच्या उलट कार्य केले जात असल्याने काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देणे आश्यक झालं आहे. आपण 21 व्या शतकात आहोत. भारत हा देशातील सर्वात तरुण देश आहे. देशातील तरुणांना एक सक्षम आणि मजबूत नेतृत्व हवं आहे. काँग्रेस पक्ष केवळ विरोधाच्या राजकारणापुरती मर्यादित राहिल्याचं गेल्या तीन वर्षापासून मी पाहत आहे. देशातील लोकांना केवळ विरोध नकोय. त्यांना देशाच्या भविष्याबाबत विचार करणारं नेतृत्व हवं आहे. अयोध्येतील राम मंदिर असो, सीएए-एनआरसीचा मुद्दा असेल, काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा विषय असेल अथवा जीएसटीचा निर्णय असेल, या सर्व विषयावर देशातील लोकांना तोडगा हवा होता. मात्र, काँग्रेस पक्षाने यात केवळ अडथळा बनण्याचं काम केलं. देश असो, गुजरात असो किंवा पटेल समाज असो काँग्रेसने केवळ केंद्र सरकारला विरोध करण्यापलिकडे काही केलं नाही. त्यामुळेच देशातील जनतेने जवळपास संपूर्ण देशातून काँग्रेसला हद्दपार केलं. कारण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना साधा बेसिक रोडमॅपही देता आला नाही, असं हार्दिक पटेल यांनी पत्रात नमूद केलं आहे.
कोणत्याही मुद्द्याकडे गांभीर्याने न पाहणं हा वरिष्ठ नेतृत्वाचा सर्वात मोठा दोष आहे. मी जेव्हा जेव्हा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटलो. त्यांचं लक्ष गुजरातकडे वेधण्याचा प्रयत्न केला. गुजरातमधील समस्यांवर त्यांचं लक्ष्य केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेव्हा त्यांचं लक्ष आपल्या मोबाईलमध्ये होतं. किंवा इतर गोष्टींकडे. जेव्हा जेव्हा देश संकटात सापडला आणि अशावेळी काँग्रेस नेतृत्वाची गरज भासली तेव्हा आमचे नेते विदेशात होते. गुजरात आणि गुजराती माणसांबद्दल द्वेष असावा, अशीच ज्येष्ठ नेत्यांची मानसिकता पाहायला मिळाली, अशी टीका हार्दिक पटेल यांनी केली आहे.
आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आपल्या खर्चाने दिवसाला 500-600 किलोमीटराच प्रवास करतो. जनतेत जातो. मात्र, गुजरातमधील बडे नेते आमचं म्हणणं ऐकतच नाही. दिल्लीत आलेल्या नेत्यांना चिकन सँडविच वेळेत मिळाला की नाही यावर फक्त ते लक्ष देतात. मी अनेक तरुणांना भेटलो, तेव्हा गुजरातींचा अपमान करणाऱ्या पक्षात तुम्ही का आहात असं मला त्यांनी विचारलं. उद्योग क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो की राजकारण. प्रत्येक ठिकाणी गुजराती लोकांचा अपमान केला जातो. मला वाटतं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तरुणांचाही विश्वासघात केला आहे. त्यामुळेच आजचा तरुण काँग्रेससोबत यायला तयार नाही.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी जाणूनबुजून गुजरातच्या जनतेला कमजोर केलं. त्याबदल्यात स्वत:चं आर्थिक हित साधलं हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे. राजकीय विचारधारा वेगळी असू शकते. पण काँग्रेस नेत्यांचं असं विकलं जाणं हा म्हणजे राज्यातील जनतेचा विश्वासघातच आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
जनतेची सेवा करणं हा राजकारणात सक्रिय असलेल्या प्रत्येक व्यक्तिचा धर्म असतो. दुर्देवाची गोष्ट म्हणजे काँग्रेसला गुजराती जनतेसाठी काही करायचं नाही. त्यामुळेच मी जेव्हा जेव्हा गुजरातसाठी काही चांगलं करायला गेलो तेव्हा तेव्हा माझा तिरस्कार केला गेला. काँग्रेस नेतृत्वाच्या मनात आमचं राज्य, आमचा समाज आमि तरुणांबाबत इतका द्वेष आणि तिरस्कार असेल याचा मी कधी विचारच केला नव्हता.
आज मी हिंमत करून काँग्रेसच्या पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझ्या या निर्णयाचं स्वागत माझे सहकारी आणि गुजरातची जनता करेल असा मला विश्वास आहे. माझ्या या निर्णयानंतर भविष्यात गुजरातसाठी मी सकारात्मक कार्य करेल याचा मला विश्वास आहे. जनतेकडून मिळालेल्या प्रेमाचं ऋण फेडण्यासाठी मी कायम प्रयत्न करत राहील.
धन्यवाद.
18/05/2022