Hemant Soren : हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार
हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत. विधिमंडळ पक्षांच्या बैठकीत हेमंत सोरेन यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच राज्यपालांना भेटून ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.
हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत. ईडीने अटक केल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बरेच महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडीच्या विधिमंडळ पक्षांच्या बैठकीत हेमंत सोरेन यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्यासाठी चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते लवकरच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. कथित जमीन घोटाळ्यात हेमंत सोरेन यांना अटक झाली होती.
मुख्यमंत्री चंपाई सोरेन लवकरच राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवणार आहेत. चंपाई सोरेने यांना झामुमोचे कार्याध्यक्ष बनवले जाऊ शकते. सध्या हेमंत सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्याध्यक्ष आहेत.
जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना अटक झाल्यानंतर 28 जून रोजी हेमंत सोरेन यांची तुरुंगातून सुटका झालीये. हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. चंपाई सोरेन यांनी 2 फेब्रुवारी रोजी राज्याचे 12 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
आता हेमंत सोरेन यांची सुटका झाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होत आहेत. मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचे सर्व महत्त्वाचे कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहेत. झारखंडेमध्ये काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हेमंत सोरेन हेच झामुमोचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील हे दाखवण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री केलं जाणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथील आघाडीने चांगली कामगिरी केली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर हेमंत सोरेन आणखी आक्रमक झाले आहेत. आगामी निवडणुकीत ते भाजपचा पराभव करण्यासाठी व्हिक्टिम कार्ड खेळू शकतात.
दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील दारु घोटाळ्यात ईडीकडून अटक झाली होती. पण त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नव्हता. तुरुंंगात राहूनच ते सरकार चालवत होते. हेमंत सोरेन यांना केजरीवाल यांच्या आधी अटक झाली होती. केजरीवाल यांना सत्ता न सोडता अटकेत राहिल्याने आता हेमंत सोरेन यांनी जामीनावर बाहेर येताच पुन्हा मुख्यमंत्री होण्याची तयारी सुरु केलीये.