Sanjay Raut: संजय राऊत यांच्या घराबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा, राऊतांना घराबाहेर नेण्यास ईडीला शिवसैनिकांचा विरोध, भगव्या उपरण्यातले राऊत..
पत्राचाळीशी संबंधित कोणतीही कागदपत्रे राऊत यांच्या घरी सापडलेली नसल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले आहे. 9 तासांच्या चौकशीत संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. ईडीच्या कार्यालयात नेऊन संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली आहे.
मुंबई– शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या घरावर आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीने (ED)छापेमारी केली . सुमारे ९ तास राऊत यांची त्यांच्या भांडूप येथील मैत्री या निवासस्थानी चौकशी करण्यात आली, त्यानंतर राऊत यांना ईडीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेले जात असताना शिवसैनिकांनी (Shiv sainik)मोठा विरोध केला. सकाळपासून शिवसैनिक मोठ्या संख्येने राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झालेले आहेत. कुठल्याही स्थितीत संजय राऊत यांना अटक करुन बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. आमच्या अंगावरुन संजय राऊत यांना घेवून जावे लागले, अशी भूमिका शिवसैनिक महिला आणि पुरुषांनी घेतली होती. संजय राऊत भगवे उपरणे घालून बाहेर आले , त्यांनी हात उंचावत शिवसैनिकांना अभिवादन केले. जीपवर चढून त्यांनी भगवे उपकरणं फटकावले आणि भगवा फडकेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
#WATCH | Mumbai: Shiv Sena leader Sanjay Raut being taken by ED officials along with them after he was detained in connection with Patra Chawl land scam case from his residence pic.twitter.com/VtjjuQJhxM
— ANI (@ANI) July 31, 2022
शिवसैनिकांचा गेटबाहेर मोठा विरोध
त्यानंतर संजय राऊत यांची गाडी बाहेर पडेपर्यंत शिवसैनिकांनी मोठा विरोध केला. गेटबाहेर असलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांना गाड्यांमध्ये बसवून पोलीस स्टेशनकडे नेले. यावेळी संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनीही बाहेर येत शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र शिवसैनिक आक्रमकच होते. अखेरीस सुनील राऊतांच्या आवाहनानंतर आणि पोलिसांच्या गराड्यात संजय राऊत यांना त्यांच्या घरातून ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले.
काय म्हणाले सुनील राऊत
यावेळी सुनील राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्राचाळीशी संबंधित कोणतीही कागदपत्रे राऊत यांच्या घरी सापडलेली नसल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले आहे. 9 तासांच्या चौकशीत संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. ईडीच्या कार्यालयात नेऊन संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली आहे. तिथे जबाब नोंदवल्यानंतर राऊत यांना अटक होईल की नाही, याची स्पष्टता येणार असल्याची माहिती आहे. ईडीच्या कार्यालयातही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा असल्याची माहिती आहे.
राऊतांच्या घराबाहेर मोठा फौजफाटा
राऊत यांच्या अटकेची शक्यता असल्याने सकाळपासून राऊत यांच्या बंगल्याबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. बंगल्याच्या दोन्ही गेटवर शिवसैनिक, पोलीस आणि माध्यमांची मोठी गर्दी झालेली होती.