हिंडनबर्ग प्रकरणावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, अदानी ग्रुपच्या 10 शेअरची आज काय होती परिस्थिती?
शॉर्ट सेलर अँडरसन तसेच त्यांच्या सहकार्यांनी लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. त्यांच्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन देण्याची मागणी याचिकेत केली आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेतून हिंडेनबर्ग नावाचे वादळ येते अन् भारतात गौतम अदानींचे संपूर्ण साम्राज्य हादरून जाते. संसदेपासून शेअर मार्केटपर्यंत फक्त अदानींचीच चर्चा होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी गौतम अदानी हे जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. आता 21 व्या क्रमांकावर गेले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. गुरुवारी अदानी ग्रुपचे 10 शेअर पैकी नऊ शेअरमध्ये घसरण झाली होती.
हिंडेनबर्गच्या अहवालाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. हिंडेनबर्ग कंपनीचे मालक आणि संस्थापक नॅथन अँडरसन विरोधात कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. वकील मनोहरलाल शर्मा यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.
त्यावर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड ( CJI D.Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठात शुक्रवारी 10 फेब्रवारी रोजी सुनावणी करणार आहे. शॉर्ट सेलर अँडरसन तसेच त्यांच्या सहकार्यांनी लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. त्यांच्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन देण्याची मागणी केली आहे.
याचिकेनुसार, आयपीसी कलम 420 व 120 नुसार शॉर्ट सेलर अँडरसन यांच्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अँडरसन यांनी भारतीय संस्थांविरोधात कट रचल्याचा आरोपही याचिकेत केला आहे.
अदानी ग्रुपच्या 9 शेअरमध्ये घसरण
अदानी ग्रुपचे 10 शेअरपैकी 9 शेअरमध्ये गुरुवारी घसरण होती. केवळ अदानी विल्मर कंपनीचे शेअर वाढले होते. सकाळच्या सत्रात अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 15 % घसरला.
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये 9 %, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जीने पाच टक्क्यांच्या लोअर सर्किटला धडक दिली. तर अंबुजा सिमेंट्स 5.4 टक्के, एसीसी 4 % आणि एनडीटीव्ही स्टॉकमध्ये 3 % घट झाली.
काय आहे हिंडनबर्ग
हिंडनबर्ग रिसर्चने जगभरातील अनेक कंपन्यांचा भांडाफोड केला आहे. या संशोधन संस्थेची स्थापना नाथन एंडरसनने (Nathan Anderson) 2017 मध्ये केली होती. ही एक आर्थिक संशोधन करणारी संस्था (Financial Research Firm) आहे.
इक्विटी, क्रेडिट आणि डेरिवेटिव्हसचे विश्लेषण, संशोधन करुन ही संस्था अहवाल तयार करते. या संस्थेचे नाव ठेवण्यामागेही रंजक इतिहास आहे. अमेरिकेतील न्यू जर्सीमधील मॅचेस्टर टाऊनशिप जवळ एक विमान दुर्घटना झाली होती. 1937 मध्ये हिंडनबर्ग एअरशिपचा अपघात झाला होता. त्यावरुन या फर्मचे नाव ठेवण्यात आले आहे.
नाथन एंडरसन यांनी इस्त्राईलमध्ये रुग्णवाहिका चालक म्हणून काम करत होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यात पदवी मिळवली आहे. त्यांनी डेटा कंपनी फॅक्टसेट रिसर्च सिस्टम्स इंकपासून आपल्या करियरला सुरुवात केली. हॅरी मार्कपोलोस हा त्याचा आदर्श आहे.
मार्कपोलोस हे सुद्धा एक विश्लेषक आहे. त्यांनी बर्नी मेडॉफ (Bernie Madoff) यांच्या एका योजनेचा भांडाफोड केला होता.