अयोध्येत पीओकेतून असे पोहोचले पवित्र नदीचे पाणी, पाहा ब्रिटनमार्गे का आणावे लागले भारतात?
Ram Mandir : अयोध्येत सर्व नद्यांचे पाणी एकत्र करण्यात आले आहे. कारण याच पाण्याने रामलल्लाचं अभिषेक केला जाणार आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी पीओके मध्ये देखील आनंद उत्सव साजरा केला जाणार आहे.
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्रीराम भक्तांमध्ये या निमित्ताने प्रचंड उत्साह आहे. रामलल्लाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी जगभरातील प्रवित्र नद्यांचे पाणी वापरले जाणार आहे. यामध्ये पीओकेमधून देखील नदीचे पाणी पाठवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे एका मुस्लीम तरुणाने पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) शारदा पीठ कुंडातून पवित्र पाणी गोळा करुन दे ब्रिटनमार्गे भारतात पाठवले आहे.
POK मधून भारतात आले पाणी
वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, सेव्ह शारदा कमिटी काश्मीर (एसएसकेके) चे संस्थापक रविंदर पंडिता यांनी सांगितले की, 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील टपाल सेवा निलंबित करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गाने पवित्र पाणी पाठवणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत तनवीर अहमद आणि त्यांच्या टीमने पीओकेमधील शारदा पीठातील शारदा कुंडातून पवित्र पाणी गोळा केले. ते पाणी नागरी समाजाच्या सदस्यांनी नियंत्रण रेषेवरून इस्लामाबादला नेले. तेथून हे पाणी ब्रिटनमध्ये पाठवले. त्यानंतर ब्रिटीनमधून ते भारतात आले.
ऑगस्ट २०२३ रोजी अहमदाबादला आलेल्या काश्मिरी पंडित कार्यकर्त्या सोनल शेर यांच्याकडे ते पवित्र पाणी सुपूर्द केले. त्यानंतर ते दिल्लीत आले. अशा प्रकारे भारत आणि पाकिस्तानमधील टपाल सेवा बंद असल्याने पवित्र पाणी दुसऱ्या देशांमधून भारतात आणावे लागले.
पीओकेमध्ये आहे शारदा सर्वज्ञ पीठ
शारदा सर्वज्ञ पीठ 1948 पासून दुर्गम स्थितीत आहे. ते PoK मधील नियंत्रण रेषेच्या पलीकडे आहे. पण असं असलं तरी त्या ठिकाणाहून माती, खडक आणि आता पाणी पाठवण्यात आले आहे. 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या अभिषेक दरम्यान ते पाणी आता वापरले जाणार आहे.
हे पवित्र पाणी विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेत्यांना सुपूर्द केले गेले आहे. त्यांनी ते पाणी शनिवारी अयोध्येतील ज्येष्ठ कार्यकर्ता कोटेश्वर राव यांच्याकडे सुपूर्द केले आहे. 22 जानेवारी रोजी कुपवाडा जिल्ह्यातील टीतवाल येथे नियंत्रण रेषेजवळील शारदा मंदिरात अभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी दिवे लावले जाणार आहेत.