भारतातील हे गाव बनलं ‘युट्यूब कॅपिटल’; इथल्या घराघरात कंटेंट क्रिएटर, युट्यूबद्वारे करतात हजारोंची कमाई
एकीकडे युट्यूबवरील 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो त्यातील अश्लीलतेमुळे चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे याच युट्यूबने भारतातल्या एका छोट्याशा गावात क्रांती घडवून आणली आहे. या गावातल्या घराघरात कंटेंट क्रिएटर पहायला मिळतोय. युट्यूबद्वारे गावकरी हजारोंची कमाई करत आहेत.

गावातल्या शेतात तीन-चार बायका काम करत असताना एक तरुण त्यांच्याजवळ येतो आणि त्याच्या व्हिडीओमध्ये सहभागी होण्याची विनंती करतो. त्यानंतर लगेचच त्या बायका डोक्यावरील पदर नीट करून, चेहऱ्यावर स्मित हास्य आणून तरुणाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या कॅमेरासमोर उभे राहतात. 32 वर्षांचा युटयूबर जय वर्मा त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करतो आणि पुढे निघून जातो. याच गावात आणखी थोडं पुढे गेल्यावर एक ग्रुप त्यांचा सेटअप लावण्यात व्यग्र दिसतो. त्या ग्रुपमधील 26 वर्षीय राजेश दिवार हिप हॉप डान्स करतो आणि त्याचा व्हिडीओ दुसरा मुलगा मोबाइलमध्ये रेकॉर्ड करतो. या सर्वातून नेमकं काय सांगायचं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही सर्व दृश्ये आहेत छत्तीसगडमधल्या रायपूरजवळच्या तुलसी या गावातील. तसं हे गाव इतर सर्वसामान्य गावांसारखंच आहे. पण त्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. ही ओळख म्हणजे ‘युट्यूब कॅपिटल’. या लेखाच्या सुरुवातीला ज्या काही दृश्यांचं वर्णन केलंय, ती सर्व दृश्ये गावकऱ्यांनी युट्यूबवरील कंटेट तयार करण्यासाठी टिपली आहेत. ...